लोकसत्ता टीम

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीच्या मृत्यूची अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने प्रशासनही हादरले आहे. प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने ‘माया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘टी-१२’ वाघिणीला मृत घोषित केलेले नाही. त्यामुळे या वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आवर घालावा, असे आवाहन ताडोबा प्रशासनाने केले आहे.

‘टी-१२’ नावाच्या वाघिणीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी १८ नोव्हेंबरला या कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकाचा समाजमाध्यमांवर चुकीचा अर्थ लावण्यात आला. यात प्रशासनाने या वाघिणीला मृत घोषित केल्याचे त्यावर प्रकाशित करण्यात आले. मात्र, हे चूकीचे असल्याचे या व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-एसटीच्या बुलढाणा विभागाची ‘दिवाळी’!…. ‘लालपरी’ला साडेपाच कोटींचे उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणि आसपासच्या ‘टी-१२’ च्या स्थानावर लक्ष ठेवण्यासाठी गस्त आणि कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. १८ नोव्हेंबरला गस्तीदरम्यान गोळा केलेल्या हाडांचा नमुना पुढील विश्लेषणासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्र येथे पाठवण्यात आला आहे. या केंद्रात हा कोणता प्राणी आहे, नर आहे की मादी आहे याचे परिक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. त्यामुळे या कार्यालयाकडून जोपर्यंत अधिकृत प्रसिद्धीपत्रक येत नाही, तोपर्यंत यासंदर्भात कोणत्याही अफवा पसरवणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.