नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघ हमखास दिसणारच आणि म्हणूनच देशविदेशातील पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर याच व्याघ्रप्रकल्पाची निवड करतात. अलीकडच्या काही वर्षात तर ताडोबाच्या कोअर भागातच नाही तर बफर क्षेत्रात सुद्धा सहज व्याघ्रदर्शन होत आहे. किंबहुना कोअरपेक्षा बफर क्षेत्रात अधिक चांगले व्याघ्रदर्शन होत आहे आणि त्यामुळेच पर्यटकांची पावले बफरकडे अधिक वळताना दिसून येतात. मात्र, आता ताडोबातील वाघ कुठेही दिसून येत असल्याने पर्यटकच नाही तर सामान्य नागरिकदेखील त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने या वाघाच्या मार्गावर येत आहेत. काहीजण वाहनांच्या खाली उतरत आहेत. यावर व्याघ्रप्रकल्पाला देखील नियंत्रण आणणे कठीण झाले असून अशावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडच्या आठ दिवसातमोहर्ली रस्त्यावरील असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध व्याघ्रप्रकल्प आहे. भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांपैकी हे एक असे वन्यजीव अभयारण्य आहे, जिथे वाघांची संख्या अधिक आहे. या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, अनेक पक्षी व प्राणी आढळतात. दरदिवशी हजारो लोक ताडोबा अभयारण्यात भेट देतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात काही पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले.

एक नाही तर चक्क तीन वाघांनी दर्शन दिले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.हा व्हायरल व्हिडीओ ताडोबा रोडवरील आहे या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात काही वाघ दिसतात आणि पर्यटकांनी हे वाघ बघण्यासाठी भयंकर गर्दी केलेली दिसून येत आहे. संतापजनक म्हणजे काही पर्यटक जिप्सीमधून खाली उतरून फोटो काढताना दिसत आहे आणि जोरजोराने ओरडताना दिसत आहे.

वाघांना तसेच वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी अभयारण्यात काही विशेष नियम आहेत. या नियमांनुसार जिप्सीमधून खाली उतरणे तसेच वाघांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे. ताडोबा अभयारण्यात जर वाघाचे दर्शन घ्यायचे असेल तर मार्च ते मे महिना उत्तम असतो कारण या दरम्यान वाघ पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासाबाहेर पडतात. मात्र, आता बाराही महिने व्याघ्रदर्शन होत आहे. ताडोबातील आगरझरी-मोहर्ली रस्त्यावर तीन वाघ फिरताना दिसून येत आहे. येथे पर्यटकांची वाहने कमी आणि सर्वसामान्य माणसांचीच वाहने अधिक आहेत. यातील काही जण खाली उतरून वाघांचे छायाचित्रे घेत आहेत.