लोकसत्ता टीम चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रांतर्गत ५०० पेक्षा अधिक ‘जिप्सी’तून वन पर्यटन सुरू आहे. या जिप्सीतून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने आता पर्यटनासाठी ‘बॅटरी’वर चालणाऱ्या वाहनांची योजना आणली आहे. सध्या या वाहनांची चाचणी सुरू आहे. ताडोबात जंगल पर्यटनाचा अनुभव अधिक सुखद व चांगला करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) पर्यटकांसाठी सध्याच्या वाहनांमध्ये बदल करून बॅटरीवर चालणारी वाहने (बीओव्ही) आणण्याची योजना आखली आहे. ही योजना सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. हेही वाचा. शालेय पुस्तकातील कोरी पृष्ठे ठरणार पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधी ! राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘बॅटरी’वरील वाहनाचे अनेक फायदे लक्षात घेऊन पर्यटनासाठी ‘इ-वाहने’ आणि ‘बीओव्ही’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी ‘बॅटरी’वरील ‘जिप्सी’वाहनांसाठी प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी ताडोबा व्यवस्थापनाने दोन कंपन्यांशी संपर्क साधला. मात्र, या दोन्ही कंपन्या ताडोबा व्यवस्थापनाला जे हवे आहे, त्यावर खऱ्या उतरल्या नाहीत. त्यामुळे आता दिल्लीस्थित एका कंपनीच्या माध्यमातून ई-वाहनात बदल करणाऱ्या कंपनीसोबत काम सुरू आहे. त्यात काही प्रमाणात यशही आले आहे. याचबरोबर महेंद्र व भेल या कंपन्यांसोबतच अशा वाहनांबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हेही वाचा. नागपूरमध्ये गडकरींच्या दाव्याला भाजपाकडूनच खो! जुन्या वाहनांचे ‘बीओव्ही’मध्ये रूपांतर केले आहे. कोर आणि बफर क्षेत्रात वाहन चालवून चाचणी घेतली जात आहे. दिल्लीस्थित एका कंपनीला वाहनाच्या रिट्रोफिटिंगसाठी ८ लाख रुपये दिले आहेत. यामध्ये अनेक फिचर्सचा समावेश आहे. चाचणीदरम्यान ६-८ तास चार्ज केल्यानंतर, वाहन १०० ते १२० किमी चालले. ८ तास चार्ज केल्यास दोन सफारी आरामात पूर्ण करता येतात. यशस्वी चाचणीनंतर आम्ही ही वाहने सादर करू, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘चार्जिंग स्टेशन’ची गरज नाही या वाहनांसाठी कोणत्याही ‘चार्जिंग स्टेशन’ची आवश्यकता नाही. वाहनातील ‘बॅटरी’ कोणत्याही १५-अँपिअर पॉवर प्लगमधून चार्ज केली जाऊ शकते. वाहनामध्ये बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आहे, जी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीचे इलेक्ट्रॉनिक्स व्यवस्थापित करते आणि आग लागण्याची भीती नसते. वाहनाला चारचाकी आणि हिल असिस्टंट आहे, जे वाहन मागे वळण्यापासून थांबवण्यासाठी स्वयंचलितपणे सक्रिय होते. बॅटरी सायकलचे आयुष्य ५ वर्षे आहे.