अमरावती: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक समितीने रस्‍त्‍यावर उतरण्‍याचा निर्णय घेतला असून जुनी पेन्शन लागू करावी, समूह शाळा योजना मुळातच बंद करावी, या प्रमुख मागण्यांसह वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यात यावी, नवसाक्षरता अभियानासह इतर अशैक्षणिक कार्यक्रम थांबवावेत, शाळा अनुदान तत्‍काळ मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक समितीने विधिमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनादरम्‍यान ११ डिसेंबर राजी मोर्चाचे आयोजन केले आहे.

नुकत्‍याच तुळजापूर येथे झालेल्‍या समितीच्‍या राज्‍य कार्यकारिणीच्‍या सभेत मोर्चा काढण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. बीएलओ कामे, आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या, एनपीएस / डीसीपीएस धारक शिक्षकांचे प्रश्न यासंदर्भात सभेत चर्चा करण्यात आली. सभेत सर्व जिल्हा शाखांचे लवकरच लेखापरीक्षण करण्यात येणार असून सर्व जिल्हा शाखांना ३१ जानेवारी अखेर लेखापरीक्षक भेटी देणार असून ते सर्व जिल्हा शाखेचे लेखा परीक्षण करतील त्या दृष्टीने सर्व जिल्हा शाखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या जिल्हा शाखांच्या निवडी झाल्या त्यांच्या निवडीचा ठराव संमत करण्यात आला.

हेही वाचा… दहा रेल्‍वेगाड्यांना बडनेरा स्‍थानकावर थांबा नाही! विशेष रेल्‍वे सेवेतही अमरावतीवर अन्‍याय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर नवीन संचमान्यतेनुसार जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे २ डिसेंबर रोजीच्या शिक्षणमंत्र्यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली, असे अध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितले. शिक्षकांनी मोठ्या संख्‍येने मोर्चात सहभागी व्‍हावे, असे आवाहन शिक्षक समितीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.