भत्ते वाढवण्याच्या मागणीसाठी मार्गदर्शक पदाचे राजीनामे

नागपूर :  राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांनी डॉ. नितीन करमळकर समितीच्या शिफारशीनुसार विविध भत्ते वाढवण्याच्या मागणीसाठी ५ जानेवारीपासून मार्गदर्शक पदाचे राजीनामे देत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवणे बंद केले असतानाच उद्या बुधवारपासून राज्यातील तीनही शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षक  या मागणीसाठी मार्गदर्शकपदाचे राजीनामे देऊन या विद्यार्थ्यांना शिकवणे बंद करणार आहेत. 

राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर असे तीन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालये आहेत. या महाविद्यालयातील शिक्षकांनी महाराष्ट्र स्टेट डेंटल टिचर्स असोसिएशनची स्थापना केली आहे. या संघटनेने राज्यातील तीनही महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना भत्ते वाढवण्याच्या मागणीसाठी मार्गदर्शकपदाचे राजीनामे देणार असल्याचे कळवले आहे. हे राजीनामे अधिष्ठात्यांमार्फत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठवले जाणार आहेत. या आंदोलनामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

मागण्या काय?

व्यवसायरोध भत्ता वाढवावा, वैद्यकीय अभ्यास व पदव्युत्तर भत्ता एम्सच्या शिक्षकानुसार द्यावा, जोखीम भत्ता द्यावा, अधिष्ठात्यांसह संचालक व सहसंचालकांना विशेष भत्ता द्यावा, कुंठीत वेतनवाढ सुरू करावी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुरू करावी.

डॉ. करमळकर समितीने वैद्यकीय व दंतच्या शिक्षकांच्या विविध भत्ते वाढीबाबत शिफारस केल्यावरही शासन काही करत नाही. शेवटी नाईलाजाने बुधवारी मार्गदर्शकपदाचे राजीनामे देणार आहोत. या आंदोलनाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला शासनच जबाबदार राहील.

– डॉ. सूर्यकांत देवगडे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट डेंटल टिचर्स असोसिएशन.