अकोला : राज्यात परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या वेळी १६ अंकी ‘यूआयएन’मुळे संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रकरणांचा खोळंबा टाळण्यासाठी परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अर्ज करतांना वाहन प्रणालीमध्ये वेग नियंत्रकाचा १६ अंकी ‘यूआयएन’ अद्ययावत असण्याची पाहणी काढण्यात आली. त्यामुळे परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. वेग नियंत्रण उपकरणाची पाहणी करून ते सुरू आहे की नाही याची खात्री करण्याच्या सूचना राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अपर परिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत.
काही वेग नियंत्रक उत्पादकांनी सन २०१८ नंतर परिवहन संवर्गातील वाहनांना बसविलेल्या वेग नियंत्रक उपकरणांचा ‘एमआयएस’ माहिती परिवहन विभागाला उपलब्ध करून दिली. यामध्ये वाहनांना बसवलेल्या वेग नियंत्रकाचा १६ अंकी ‘यूआयएन’ क्रमांकाची माहिती पुरवली. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणामध्ये मोटार वाहन निरीक्षकांद्वारे वाहन तपासणी करतांना वेग नियंत्रक कार्यरत असल्याची खात्री केली जाईल. सन २०१८ पासून नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या वेग नियंत्रकाचा १६ अंकी ‘यूआयएन’ क्रमांक वाहन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी ‘एमआयएस’ माहितीचा वापर केला जाणार आहे. सन २०१८ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या वेग नियंत्रक उपकरणावरील क्रमांक तपासून वाहन प्रणालीमध्ये अद्ययावत केला जाणार आहे.
मोटार वाहन निरीक्षकांना वाहन प्रणालीमध्ये वेग नियंत्रकाच्या नोंदणी क्रमांकामध्ये केलेल्या दुरुस्तीचे आवश्यक अभिलेख जतन करून ठेवावे लागतील. चुकीच्या माहितीचा वापर करून फेरबदल करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मोटार वाहन निरीक्षक व नियंत्रक अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी आलेल्या वाहनांची प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे.
वाहनांची योग्यता पडताळणी केलेली असणे आवश्यक आहे. १६ अंकी ‘यूआयएन’मुळे संकेतस्थळावर येणारी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला. वेग नियंत्रण उपकरणाची खात्री केली जाणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी स्पष्ट केले.
…तर खासगी बसवर कारवाई करता येणार नाही
‘ऑल इंडीया टूरिस्ट परमिट’ प्रवासी खासगी बसमध्ये प्रवासी चढतांना किंवा उतरत असतांना ‘अवैध पार्किंग’ संदर्भात पोलीस व परिवहन विभागाला कारवाई करता येणार नाही. ‘ऑल इंडिया टूरिस्ट परमिट’ प्रवासी वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ८२ ते ८५ (A) मधील नमूद अटींमधून वगळण्यात आले आहे. या बसमध्ये प्रवासी चढतांना किंवा उतरवत असतांना त्या वाहनांवर पार्किंगसंदर्भात कारवाई करण्यात येऊ नये, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत.