नागपूर : भारतीय जनता पक्ष हा जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून त्यात वरपासून खालपर्यंत लोकशाही पद्धतीने कामकाज चालते. त्यामुळेच सामान्य कार्यकर्ता हा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, एक साधा चहा विक्रेता देशाचा पंतप्रधान होऊ शकला आणि मीसुद्धा तीन वेळा मुख्यमंत्री होऊ शकलो ते केवळ आणि केवळ पक्ष आणि कार्यकर्त्यांमुळेच, त्यामुळे पक्षात संघनेला अधिक महत्व आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले.

नागपूरमध्ये रविवारी शहर भाजपतर्फे आयोजित पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बुथपातळीवर उत्तमप्रकारे नोंदणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. हा धागा पकडून फडणवीस यांनी कार्यकर्ते, संघटना आणि सत्ता याची सांगड कशी घातली जाते व यात कार्यकर्ता हा किती महत्वाचा असतो हे सांगितले. फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष. भाजप हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. ११ कोटी सदस्यांची नोंदणी झाली आहे. बाकी सर्व पक्ष खासगी आहे. कुठल्या तरी कुटुंबाशी त्यांची बांधिलकी आहे. भाजप मात्र कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. वरपासून खालपर्यंत लोकशाही पद्धतीने येथे नेत्यांची निवड केली जाते. कार्यकर्त्यांतून नेत्याची निवड केली जाते. त्यामुळेच एक चहा विक्रेता प्रथम गुजरातचा मुख्यमंत्री आणि नंतर देशाचा पंतप्रधान होऊ शकला. मीसुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनाला सुरुवात केली. व मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. तीनवेळा या पदावर जाण्याचा सन्मान केवळ कार्यकर्त्यांमुळे मिळाला असे फडणवीस म्हणाले. कार्यकर्त्यांमुळेच भाजपला महाराष्ट्रात सलग तीन निवडणुकांमध्ये शंभरहून अधिक जागा मिळाल्या. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – बुलढाणा : बिबट माता आणि हरवलेल्या पिल्लाची पुनर्भेट

महाराष्ट्रात विक्रमी नोंदणी होणार

महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दीड कोटी सदस्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या एक कोटी सदस्य नोंदणी आहे. ती दीड कोटी करणे अशक्य नाही. डिजिटल नोंदणीमुळे हे काम अधिक सोपे झाले आहे. डिजिटल नोंदणीमुळे कार्यकर्त्यांचे संपर्क नंबर पक्षाकडे नोंदवला जातो व त्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहचवणे शक्य होते. संपर्क आणि संवाद या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे, त्यापुढची पायरी ही संवादाची आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – चंद्रपूर : ब्रम्हपुरी परिसरात लवकरच पाच साखर कारखाने, आमदार विजय वडेट्टीवार यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर महानगराचे सात लाखाचे लक्ष्य

नागपूर महानगर भाजपने सात लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य निर्धारित केल्याचे पक्षाचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक लाख आणि संपूर्ण महानगरातून एक लाख असे एकूण सात लाख सदस्य नोंदवण्यात येणार आहे.