भंडारा : साकोली तालुक्यातील मुख्य तलाव आज दिनांक ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या या तलावाची पाळ फुटल्यामुळे परिसरात पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
साकोली तालुक्यातील साकोली गावात महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या तलावाचा बांध फुटल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.हे पाणी साकोली आणि गडकुंभळी गावातील सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रातून वाहत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या दोन घरात पाणी शिरले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यात मामा तलावाची संख्या मोठी आहे. साकोली तालुक्यातील बहुतांश मोठमोठी तलाव आजही दुरूस्तीची वाट पाहत आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक तलावाची अवस्था खराब झाली आहे.
दोन घरात पाणी
या घटनेने संपूर्ण साकोली शहर हादरले असून, दोन घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी आणि माजी नगरसेवक ऍड. मनिष कापगते यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कापगते यांच्या मते, “तलावाच्या सौंदर्याकरणाच्या नावाखाली बांधकाम विभागाने पिचिंगचे दगड जेसीबीने काढल्याने तलावाची पाळ कमकुवत झाली आणि ही दुर्घटना घडली.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या तलावाच्या भगदाडाबाबत वारंवार माहिती दिली होती. भगदाडातून पाणी वाहत असल्यामुळे ते भगदाड मोठे झाले आणि पावसाळ्यामुळे तलावात पाणी ओव्हरफ्लो झाले. प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर आणि पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाने नागरिकांना तलावाच्या पाळीकडे न जाण्याचा इशारा दिला आहे, कारण अजूनही प्रवाहात माती सरकून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. लोकांनी तलावाच्या परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. या घटनेमुळे साकोली तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. सध्या तांदूळ मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.