यवतमाळ: त्याचे मित्राच्या पत्नीसोबत सूत जुळले. मात्र, तिचा पती तिला नेहमी मारहाण करत असल्याने ‘तो’ अस्वस्थ राहायचा. अखेर त्याने तिच्या पतीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले आणि सुपारी देऊन प्रेयसीची पतीच्या मारहाणीतून सुटका केली. मात्र हा गुन्हा लपून राहिला नाही आणि २४ तासांतच प्रियकर मारेकऱ्यांसह गजाआड झाला.

दारव्हा शहरालगतच्या कुपटा मार्गावर मंगळवारी रात्री एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलीस ठाण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. बुधवारी त्याचा उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस पथकांनी तपास हाती घेत २४ तासांत गुन्हा उघड केला.

हेही वाचा…. नागपुरात काय सुरू आहे ? खंडणी दिली नाही म्हणून दुकानदारावर गोळीबार

प्रियकराने प्रेयसीच्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे. उमेश सदाशिव चव्हाण (२७, रा.मांगकिन्ही) असे मृताचे नाव आहे. तो बांधकाम मजूर म्हणून काम करायचा. आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण याचे उमेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. उमेश पत्नीला मारहाण करतो, हे शंकरला खटकत होते. दारव्हा पोलिसांनी उमेश चव्हाण याच्यासोबत शेवटी कोण होते, याचा शोध घेतला असता आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याची चौकशी असता सुरुवातीला त्याने अज्ञातांनी हल्ला करून ते दुचाकी व मोबाईल घेवून पळून गेल्याचा बनाव केला.

हेही वाचा… पंतप्रधान, उपराष्ट्रपती, चार मुख्यमंत्र्यांसह शेकडो राजकारणी घडवणारे ‘विद्यापीठ’ झाले शंभर वर्षांचे

घटनेची माहिती पोलिसात का दिली नाही या प्रश्नावर आरोपी शंकर अडकला. नंतर त्याने गुन्हा कबूल करीत महिनाभरापासून उमेशच्या हत्येची संधी शोधत असल्याचेही सांगितले व सर्व घटनाक्रम कथन केला. शंकरने उमेशला मारण्यासाठी रामा शंकर जाधव (२९, रा. सिंदखेड ) व त्याच्या एका साथीदाराला ३० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी रामा जाधव याला अटक केली, तर त्याचा साथीदार घटनेपासून पसार झाला. या प्रकरणी कट रचून खून केल्याचा गुन्हा दारव्हा पोलिसांनी दाखल केला. अटकेतील आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा… तेलांगणात कर्जमाफी.. ‘बीआरएस’चा नागपुरात जल्लोश.. पण फटाक्यांवर पाणी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी, सुनील राठोड, रवी मोर्लेवार, सुशील चेके, सुरेश राठोड, अमोल सोनुने करीत आहेत.