नागपूर: नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. एका कर्मचाऱ्याच्या विभागीय चौकशी प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी येत्या ४ जानेवारीला आरोग्य उपसंचालक यांना न्यायालयात हजर राहायचे आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

भागवत लाड या कर्मचाऱ्याच्या विरोधातील विभागीय चौकशी मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. चौकशी प्रलंबित असतानाच ३१ मे २०२१ रोजी लाड निवृत्त झाले. मात्र चौकशी पूर्ण झाली नसल्याने त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ रोखण्यात आले. यामुळे ला़ड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मागील सुनावणीत न्यायालयाने विभागीय चौकशी कधी पूर्ण होईल याबाबत विचारणा केली होती.

हेही वाचा… फडणवीसांच्या ‘देवगिरी’च्या तोडीचाच अजितदादांचा ‘विजयगड’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही माहिती दिली नाही तसेच उत्तरही दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोग्य उपसंचालकांना न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. येत्या ४ जानेवारीला दुपारी २.३० वाजता आरोग्य उपसंचालकांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहायचे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड.एन.डी.ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.