सुमित पाकलवार

गडचिरोली : ओडिशातील जंगल परिसरातील खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे पारंपरिक अधिवास बाधित होऊन स्थलांतरित झालेला २३ रानटी हत्तींचा कळप २०२१ च्या शेवटी छत्तीसगडमार्गे गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाला. तेव्हापासून हा कळप गडचिरोली, देसाईगंज वनविभागाच्या क्षेत्रात अन्न व पाण्याच्या शोधात भ्रमंती करतो आहे. यामुळे त्या भागातील हजारो हेक्टर शेतपिकाचे प्रचंड नुकसान होत असून हल्ल्यात काही सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागल्याने वन विभागाविरोधात रोष वाढतो आहे.

केवळ पश्चिम बंगालमधील ‘हुल्ला पार्टी’वर अवलंबून असलेल्या वनविभागासमोर या हत्तींना रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षात उत्तर गडचिरोलीतील जंगलात ताडोब्याहून स्थलांतरित वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी मानवावर हल्ल्याचे प्रमाणदेखील वाढले. त्यामुळे या परिसरात मानव वन्यजीव संघर्षाची स्थिती अधिक गंभीर आहे. अप्रशिक्षित मनुष्यबळाच्या आधारे हे संकट सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनविभागासमोर दोन वर्षांपासून रानटी हत्तींचे नवे भिमकाय संकट उभे झाले आहे. २३ हत्तींचा हा कळप छत्तीसगड सीमेवरील मुरूमगाव वनपरिक्षेत्रातून जिल्ह्यात दाखल झाला.

हेही वाचा >>> अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळाचा प्रवास जाणून घ्या…

धानोरा, गडचिरोली, कुरखेडा,कोरची तालुका तर गोंदिया व भांडार जिल्ह्यातील काही भागात या हत्तींनी अन्न व पाण्याच्या शोधात शेकडो हेक्टरवरील पिकांची नासधूस केली. अजूनही त्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. यातील काही हत्ती भरकटून चंद्रपूर जिल्ह्यात देखील गेले होते. त्याठिकाणी कळपातील एका हत्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हत्तींच्या हल्ल्यात आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ३ लोकांना जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्हा मुख्यालयापासून १० किलोमीटरवर असलेल्या दिभना गावातील एका शेतकऱ्याला हत्तीने पायाखाली तुडवून ठार केले. त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या मानवी वस्त्या धोक्यात आल्या आहे.

हेही वाचा >>> Samruddhi Highway: देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण

सद्यास्थितीत ‘हुल्ला पार्टी’ आणि वनविभागाची चमू या कळपावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांना मानवी वस्त्यांपासून लांब पळवून लावण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे. परंतु, हा कळप रात्रीच्या सुमारास गावात शिरल्यास सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काँग्रेसचा वनसंरक्षकाना घेराव

हत्ती, वाघासह जंगली प्राण्याने ज्या शेतकऱ्याचे नुकसान केले त्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्यात यावी, जंगली प्राण्याच्या हल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी. नुकसान भरपाई देण्याचा प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यात याव्या, गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची निर्मिती करण्यात यावी. या मागण्याना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला घेराव करून १५ दिवसाचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला. मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुल्ला पार्टी’ आणि वनविभागाची चमू या कळपावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांना गावापासून पळवून लावण्याचे शक्य ते प्रयत्न केल्या जात आहे. नागरिकांनी अतीधाडस करून या कळपाच्या जवळ जाऊ नये. -रमेश कुमार वनसंरक्षक, गडचिरोली