सव्वा हजार तरुणांमधून राष्ट्रीय स्तरावर निवड; ‘प्रादेशिक एकात्मिक जलस्रोत आणि व्यवस्थापन’ या विषयावर संखोल संशोधन
ग्राम स्वच्छतेचे वारे संपूर्ण देशात वाहत आहेत. अशातच भारताचे आधार स्तंभ असलेल्या तरुणांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एका उपक्रमांतर्गत नागपूरच्या पाच तरुणांची ‘स्वच्छ भारत दूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे. साहजिकच शहरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर एका संशोधन स्पध्रेचे आयोजन ‘दि टाटा एनर्जी रिसोस्रेस इन्स्टिटय़ूट’तर्फे करण्यात आले होते. ‘प्रादेशिक एकात्मिक जलस्रोत आणि व्यवस्थापन’ या विषयावर सखोल अध्ययन आणि संशोधन करून प्रस्ताव देण्याचे आवाहन महाविद्यालयीन विद्यार्थाना करण्यात आले होते. या स्पध्रेत देशभरातून तब्बल सव्वा हजार तरुणांनी सहभाग नोंदवून संशोधन पाठविले होते. विविध विषयांत स्नातक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या प्रस्तावांची निवड प्रक्रिया जिल्हास्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत झाली. याच स्पध्रेत नागपूरच्या राज मदनकर, अरिना मुरियन, अक्षय देशमुख, मॉन्सी मॅथ्यू आणि प्रार्थना मौनिकरने आपले अभ्यासपूर्ण संशोधन पाठविले. दिलेल्या विषयावर परिसरातील कुठलाही जलस्रोत निवडून त्यावर संशोधन कार्य करायचे होते. नागपूराच्या तरुणाईने यासाठी सक्करदरा तलाव निवडला. त्यावर अध्ययन सुरू केले. जून २०१४ ते जानेवारी २०१६ या दीड वर्षांच्या कालावधीत तलावाचा इतिहास व त्यावरील मालकी, तलावातील पाण्याची उपयोगिता, पाण्याच्या चाचण्या, तेथील जैव विविधतेचा अभ्यास, सभोवतालचा परिसर, नजीकच्या वस्तीतील लोकांशी संवाद व परिचय वर्ग, तलावाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संलग्नित असलेल्या संस्थांशी चर्चात्मक बठकी आणि लोकसहभागातून जनजागृती विषयक कार्य त्याठिकाणी केले. काही जाणकार व्यक्तींशी वार्तालाप करून व तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनात हा सखोल अभ्यास व संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर त्याची प्रस्ताव स्वरुपात मांडणी करुन दिल्लीला पाठवण्यात आला.
स्पर्धात्मकरित्या झालेल्या निवड प्रक्रियेतून भारताच्या पश्चिम क्षेत्र महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यस्तरावर नागपूरच्या तरुणांच्या संशोधनाने पहिला क्रमांक पटकाविला. मात्र या नंतर नागपूरच्या तरुणाईची खरी परीक्षा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरकरांच्या संशोधनावर व्यावसायिकांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्यासाठी प्रावीण्यस्वरुप प्रस्ताव आणि खोलीवर अभ्यास करण्यासाठी जर्मनी येथून ५ शास्त्रज्ञांबरोबर दिल्ली नजीकच्या गुडगाव येथे आठ दिवस प्रशिक्षण वर्ग झाला. ज्यामध्ये भारताच्या अन्य क्षेत्रातून पहिले १० प्रस्ताव आले होते. विषयाबद्दल विविधांगी माहिती मिळाल्याने नागपूरच्या तरुणांच्या प्रस्तावाला आणखी प्रबळ बनवण्याची संधी या माध्यमातून त्यांना मिळाली. त्यामुळे नागपूरच्या तरुणांना अधिक नव्या कल्पना सुचल्या. तर्क विर्तक करून अधिक चांगल्या पद्धतीने सर्वसमावेशक अभ्यास करण्याची दिशा या वर्गातूनन त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर परत एकदा संशोधन प्रस्ताव अधिक सक्षमपणे तयार करून २८ जानेवारी २०१६ रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय स्पध्रेत सादर करण्यात आला आणि निकालाअंती देशाभरातून आलेल्या विविध निवडक संशोधनातून नागपूरकर तरुणांनी चवथा क्रमांक पटकावला.
या संपूर्ण संशोधन व निवड प्रक्रियेत सादरीकरण पद्धती, वक्तृत्व शैली, भाषेची सुस्पष्टता, विषयाचे सखोल ज्ञान, इतरांशी वर्तन, पोशाख व अन्य काही प्रमुख घटकांच्या आधारावर ५० जणांची अंतिम निवड संपूर्ण भारतातून करण्यात आली. यासाठी कोका-कोला फाऊंडेशन, वॅपकॉस, युएस-ऐड, रॉबर्ट बॉश स्टफटिंग, केंद्रीय गंगा स्वच्छता मंत्रालय, केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण आणि सामाजिक वनीकरण सेवा, आंतराष्ट्रीय संस्था, सरकारी व गर-सरकारी संघटना, विद्यापीठांचे कुलगुरु आणि विषयातील तज्ज्ञ मंडळींनी सर्व बाजू तपासून अथवा कठीण परीक्षणातून भारतातील ५० जणांच्या चमूची निवड ‘स्वच्छ भारत राजदूत’ म्हणून केली. याच ५० जणांच्या चमूत नागपूरच्या पाच नागपूरकर तरुणांची निवड झाली. निवडलेल्या ५० जणांना आपआपल्या क्षेत्रात यथाशक्ती स्वच्छ भारताची मोहीम चालवून सर्व स्तरातील लोकांना यात सहभागी करावयाचे आहे. सामाजिक पाठबळ आणि मार्गदर्शन, सल्ले याबाबतचे पालकत्वाची जबाबदारी दिल्ली येथील टेरी विद्यापीठाने घेतली आहे.

चमू काय करणार?
निवड झालेल्या चमूला नागपूर शहरातील व ग्रामीण क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, संस्था, उन्हाळी शिबिर व संस्कार वर्गातून नव्या पिढीतील लहान मुले व युवा वर्गासमोर स्वच्छ भारत अभियानातून परिसर स्वच्छता, ग्राम स्वच्छता आणि देश स्वच्छता या विषयांवर प्रबोधनात्मक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांच्या मार्फत विषय ठामपणे समजावून सांगायचा आहे. त्या दिशेने नागपूरकर राज मदनकर, अरिना मुरियन, अक्षय देशमुख, मॉन्सी मॅथ्यू आणि प्रार्थना मौनीकर यांनी आतापर्यंत ६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास यश मिळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The five young men in nagpur appoint ambassadors for swachh bharat mission
First published on: 21-05-2016 at 03:38 IST