नागपूर : वाघाच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनखात्याची चमू कायम तत्पर असते. मग तो वाघ जखमी असेल तर त्याची आणखीच काळजी घ्यावी लागते. वडसा वनविभागात जखमी झालेल्या वाघाला शोधण्यासाठी वनखात्याने थेट “ड्रोन” चा वापर केला. या जखमी वाघाला शोधून त्याला उपचारासाठी जेरबंद करण्यात आले.
वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एम. एन. चव्हाण यांना पाच फेब्रुवारीला भ्रमणध्वनीव्दारे एक वाघ जखमी असल्याचा माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वडसा व सहाय्यक वनसंरक्षक वडसा यांनी रात्री शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यावर जाऊन पाहणी केली असता वडसा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपुरचे कक्ष क्रमांक. ९३ मधे वनक्षेत्रात रस्ता ओलांडून एक जखमी वाघ लंगडत शिवराजपुर लगतचे शेतशिवारात गेल्याची माहिती मिळाली. तसेच सदर वाघ रस्ता ओलांडत असतानाचा व्हिडीओची पाहणी केली असता एक जखमी वाघ ज्याच्या समोरच्या उजव्या पायाला जखम असून लंगडत चालत असल्याचे दिसून आले. त्यानुसार रात्री ११.३० वाजता ड्रोन कॅमेरा बोलावून पहाणी केली असता ड्रोनमध्ये शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. तेव्हा रात्रभर सदर वाघावर क्षेत्रीय कर्मचाऱ्याकडून पाळत ठेवण्यात आली व जवळील गावांना सतर्क करण्यात आले.
सहा फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजता ड्रोनव्दारे शेतशिवारात पहाणी केली असता सदर वाघ मिळाला नाही. तेव्हा वडसा, आरमोरी व कुरखेडा येथील वनकर्मचारी मिळून पाई संयुक्त गस्त केली असता सदर वाघ शिवराजपुर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ९३ मधील मिश्र रोपवनात १५.०० हेक्टरचे पश्चिम दिशेला चेनलिंग फेनसिंगच्या आतमध्ये २० मीटर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमदर्शनी पाहता सदर वाघाच्या उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले. सहा ते आठ फेब्रुवारीपर्यंत सदर वाघ त्याच परिसरात होता व तो कोणत्याही प्रकारची शिकार करण्यास असमर्थ असल्यामुळे दिनांक आठ फेब्रुवारीला दुपारी ३.४७ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी तथा नेमबाज अजय मराठे शुटर चमू यांनी सदर वाघास बेशुद्धीचे इंजेशन देऊन त्यास पकडले.
हेही वाचा – नागपूर विद्यापीठातील सावरकर वाद नेमका आहे तरी काय?
सदर जखमी वाघास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) यांनी तत्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता त्याला बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ही कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली.