अमरावती : सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या स्वायत्त संस्थेचे अमरावतीत लवकरच उपकेंद्र स्थापन होणार आहे. याकरिता आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. शासनाने अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे. बार्टी अंतर्गत नीट व जेईई परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा मिळेल.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबरोबरच या घटकांसाठी संशोधन, प्रशिक्षण आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी बार्टी अंतर्गत करण्यात येते. बार्टीचे मुख्य कार्यालय पुणे येथे विविध संशोधन व प्रशिक्षणाकरिता निवासी व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे बार्टीचे विभागीय केंद्र अमरावती येथे सुरू करण्यासंदर्भात आमदार सुलभा खोडके यांचा गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, बार्टीच्या अमरावती विभागीय केंद्राकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठानजीक मार्डी मार्गावर जागादेखील निवडण्यात आली व त्याला कुंपण सुद्धा घालण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात बार्टीचे अमरावती विभागीय केंद्र सुरू करण्यास कार्यवाही झाली नसल्याने सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव निधीची तरतूद केली. अशातच आता शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने अमरावती येथे बार्टीचे उपकेंद्र स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे.

तसेच बार्टी अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वसतीगृह व अभ्यासिकेची सुविधा मिळत असताना त्यामध्ये एनईईटी व जेईई परीक्षेसाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे या घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी किंवा आयआयटीच्या शिक्षणाकडे जाण्यास अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात सुद्धा सुलभा खोडके यांनी राज्यविधिमंडळात मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची फलश्रुती म्हणून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एनईईटी व जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. लवकरच अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू होणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.