यवतमाळ : यवतमाळ येथे सोमवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. हा शासकीय कार्यक्रम वाटण्याऐवजी महायुतीची प्रचार सभा वाटत आहे. या शासकीय कार्यक्रमातून सामान्य जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. सरकारला मिरवून घेण्याची हौस दिसत आहे, असा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने नेर येथे सभेकरिता जात असताना आज रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन तापले आहे. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणार्‍या जरांगे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. अगतिक होऊन तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन अंधारे यांनी केले. आधी हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला जात होता. आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद चिघळवल्या जात आहे. वादाचा नवीन ट्रॅक निवडण्यात आला, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – नागपूर : वीजचोरी कळवा; १० टक्के बक्षीस मिळवा

राज्यात आरक्षण, पिकविमा, दुष्काळ, बेरोजगारी असे अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. पुन्हा येईल-जाईचा खेळ नंतर खेळावा, अशी टीकाही अंधारे यांनी केली. पत्रकार परिषदेला यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी आमदार विश्‍वास नांदेकर, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, राजेंद्र गायकवाड, प्रवीण शिंदे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – दीडपट रसाळ संत्री! काय आहे, कशी आहे वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासन आपल्या दारी या अभियानातून जनतेला दिलासा द्या, अन्यथा हे अभियान तमाशा ठरेल, असे यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले. या अभियानासाठी लाभार्थ्यांची गर्दी जमविण्यासाठी अधिकार्‍यांना टार्गेट दिले जात असून, यात हयगय केल्यास कार्यवाही करण्याचा इशारा दिल्या जात आहे. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात तीन वेळा कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे सरकारवर कार्यवाही का करण्यात येऊ नये, असा प्रश्‍न खासदार सावंत यांनी उपस्थित केला.