भंडारा: सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २३ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळण्यात येत असून जीवाला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नवविवाहितेच्या आईने ११ जुलै रोजी साकोली पोलीस ठाण्यात दाखल केली. यापुर्वी नवविवाहितेने सुध्दा १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार केली असून भादविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सिव्हील वार्ड साकोली येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात राहणा-या शेख यांच्या घरी जानेवारी २०२३ मध्ये तक्रारदार महिला साबरा बी. शेख रा. अमलाई ता. सुहगपूर/ बुढार जि. शहडोल (मध्यप्रदेश) यांच्या मुलीचा विवाह झाला. मात्र विवाहानंतर वारंवार माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेला त्रास देऊन मारहाण करीत जीवेनिशी मारण्याची धमकी दिली जावू लागली. त्यामुळे नवविवाहितेने साकोली पोलीस ठाण्यात १ जूनला पती नाजिम अब्दुल रहिम शेख, वय २६, सासरे अब्दुल रहिम शेख, वय ५५, सासू आयशा अब्दूल शेख, वय ५० सर्व रा. सिव्हिल वार्ड साकोली यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचा राग मनात धरून ‘मैने तुझे तलाक दिया हैं, अब तू मेरे घर में रहने का नही’ असे बोलून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तर आमची तक्रार केल्यास मला व माझ्या मुलीला जिवेनिशी मारण्याची धमकी दिली असल्याने आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ११ जुलै रोजी पुन्हा पिडीत मुलीच्या आईने साकोली पोलिसांकडे तक्रार केली असून चौकशी करून मला व माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी मुलीची आई साबरा शेख यांनी केली आहे.