वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलून गेले की ब्रिटिशांनी बांधलेले पूल आजही भक्कम आहे. मात्र आमचे? याचे उत्तर लपून नाही. येथे तर सहा महिन्यापूर्वी बांधलेले स्टेडियम धोक्यात आले आहे.
२५ जानेवारीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या देवळीतील रामदास तडस इनडोअर स्टेडियमचे चक्क छत कोसळले. कुठलीच हानी झाली नाही. खेळाडू वाचले.बावनकुळे म्हणाले होते की असे स्टेडियम राज्यातील ग्रामीण भागात एकही नसेल. ही पावती ते आता देवू शकतील काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहे.
असेच काही प्रश्न शहरातील युवा संघर्ष वाहिनीचे किरण ठाकरे व सहकाऱ्यानी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केले. ठाकरे म्हणतात की यामुळे शहरातील नागरिक व खेळाडूंच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या स्टेडियमचे कंत्राटदार बलराम जोतवानी यांच्या ए ग्लोबिया क्रियेशन्स, नागपूर यांनी हे स्टेडियमचे बांधकाम, इनडोअर व इंटेरिअरचे काम केले आहे. या स्टेडियमचे भव्य उद्घाटन फक्त सहा महिन्यांपूर्वी २५ जानेवारी २०२५ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले होते, तेव्हा स्टेडियमच्या छताच्या इंटीरियरसाठी अतिरिक्त ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
या घटनेने स्टेडियमच्या दर्जाहीन बांधकामाचा बुरखा फाटला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुदैव. परंतु यामधून स्पष्ट होते की हे इंटिरियर डेकोरेशन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यामागे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली झालेले स्टेडियमचे काम अत्यंत निकृष्ट आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
सुरुवातीपासूनच नागरिकांनी या स्टेडियमच्या ठिकाणाचा विरोध केला होता, कारण ते देवळीच्या ऐतिहासिक मैदानाचे बलिदान देऊन स्टेडियम उभारण्यात आले होते. त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने हे स्टेडियम बांधले. ही पहिली घटना नाही; याआधीही सुद्धा येथील छताचे भाग दोन-तीन वेळा कोसळले आहेत. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना झाली नाही.
नुकत्याच या स्टेडियममध्ये राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा झाली. दररोज संध्याकाळी येथे लहान मुले व महिलांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत निकृष्ट बांधकामामुळे मोठा अपघात घडू शकतो.
विशेष म्हणजे, छत कोसळल्याबद्दल नगरपालिकेतील अभियंता व अधिकाऱ्यांना माहितीही नव्हती, हे अधिक धक्कादायक आहे. या घटनेमागे नगरपालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा व कमिशनखोरीचा हात आहे, असा आरोप केला जात आहे. अशा निकृष्ट बांधकामांची यादी मोठी आहे. सध्या नगर भवनचे देखील बांधकाम सुरु आहे हे बांधकाम देखील लोकल रेती व चुरी चा वापर करून निकृष्ठ बांधकाम केल्या जात आहे. मात्र या बांधकामाकडे देखील नगर परिषदेचे अधिकारी डोळेझाक करून या निकृष्ट बांधकामला मूकसंमती देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
ठेकेदार-अधिकाऱ्यांची साठगाठ असल्याने गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून अशी बांधकामे केली जातात. ही कमिशनखोरीची कीड आमचा पिच्छा कधी सोडणार? असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. जनतेने सजग होऊन या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याची गरज आहे. अन्यथा, अशाच घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? निकृष्ट बांधकामुळे स्टेडियम मध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन घटनेची व निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्या मुख्याधिकारी, अभियंता व कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणाऱ्या संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे व सर्व प्रमुख कामांचे स्पेशल ऑडीट करावे. ही मागणी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे व देवळीकर नागरिक करीत आहे.
या घटनेनंतर नागरिक संघटना व स्थानिक नेते नगरपालिकेवर तपासाचा दबाव आणणार आहेत. स्टेडियमच्या बांधकामातील अनियमितता उघडकीस आणून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी युवा संघर्ष मोर्चा च्या वतीने करण्यात येणार आहे.