नागपूर : काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या कुटुंबीयांची संपत्ती गेल्या साडेचार वर्षांत २ कोटी ९१ लाखांनी वाढली आहे. ठाकरे यांनी मंगळवारी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या विवरणावरून ठाकरेंची संपत्ती वाढल्याचे दिसून येते.

विकास ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती (चल-अचल) ६ कोटी ५४ लाख १२ हजार ४३ रुपये होती. आता लोकसभेसाठी दाखल शपथपत्रात ९ कोटी ४५ लाख ३७ हजार ४८१ रुपये असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ साडेचार वर्षांत २ कोटी ९१ लाख २५ हजार ४३८ रुपयांनी संपत्ती वाढली आहे. त्यांच्या कर्जाच्या रकमेतही वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १ कोटी १५ लाख ६९ हजार १७८ रुपये कर्ज होते. आता हे कर्ज वाढून २ कोटी ९२ लाख ५८ हजार ६९ रुपये इतके झाले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

विकास ठाकरे यांच्याकडे १२१ ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत ४ लाख ६५ हजार ८०० रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे ४१३ ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत १४ लाख ५२ हजार रुपये आहे. तसेच वाहन आणि बचत अशी एकूण १ कोटी २९ लाख ६५ हजार १८५ रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीकडे १ कोटी ४२ लाख ९ हजार ६२९ रुपयांची चल संपत्ती आहे.

विकास ठाकरे यांच्या नावाने ६९ लाख १० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने ६ कोटी ६६ हजार ७१ हजार ६६७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विकास ठाकरे यांच्यावर १ कोटी ५१ लाख ४१ हजार ८१३ रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर १ कोटी ४१ लाख १६ हजार २५६ रुपयांचे कर्ज आहे.

दरम्यान,विकास ठाकरे यांच्यावर २०१७ पासून आजवर विविध कलमांतर्गत वीस गुन्हे दाखल आहेत. ते आजवर एकाही गुन्हा दोषी ठरलेले नाहीत. अनधिकृतपणे मोर्चा काढणे, शासकीय कामात हस्तपेक्ष करणे, रेल्वेगाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत