गोंदिया: येत्या १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा दिवाळीसण, लक्ष्मीपूजन, दीप पूजन करिता दिवाळीनिमित्त लक्ष्मीच्या मूर्तीसह पणत्या साकारण्याच्या कामास वेग आला आहे. जवळ जवळ ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यानिमित्त घरोघरी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मूर्तीची स्थापना करत पूजन केले जाते. प्रत्येक घरातून लक्ष्मी मूर्तीची मागणी होत असते. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याच्या कामास गती मिळाली आहे. उर्वरित मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, मूर्तिकार कामात दिवस रात्र व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सहा इंचापासून ते दीड फुटापर्यंत मूर्ती तयार करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात बाजारातही मूर्ती विक्रीस दाखल होणार आहे.

हेही वाचा – उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा, आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत मूर्ती विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दरात दहा टक्के वाढ झाली आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी मूर्तीची मागणी २० टक्क्याने वाढली आहे. लहान मूर्तीची अधिक मागणी असल्याचे मूर्तिकरांकडून सांगण्यात आले. गोंदिया शहरासह लागून असलेल्या ग्रामीण भागांतूनही मूर्तींना मागणी होत आहे. नागरिकांसह मूर्तिकार तसेच विक्रेत्यांमध्येही यावर्षी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

अख्खे कुटुंब लागले कामाला

दिवाळी अगदीच तोंडावर आल्याने ग्रामीण व शहरी भागात पणत्या बनवण्याची धावपळ टिपेला पोहोचली आहे. चीतारओली, कुंभारवाड्यातील सर्व कुटुंब कामाला लागले आहे. पणत्या बनवण्यासाठी विजेवरील फिरत्या चाकाचा वापर केल्यामुळे कमी वेळेत जास्त माल तयार होत आहे. पणत्या बनवण्यासाठी काही ठिकाणी पारंपरिक चाकाचा वापर होत असला, तरी अनेक कारागिरांनी आता या कामासाठी इलेक्ट्रिक चाक वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, मजुरी व पैशांची बचत झाली आहे. शिवाय कमी वेळेत भरपूर काम होत असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा – वर्धा : ग्रामपंचायत निवडणुकीत दारूचा महापूर, सरपंचपदाचा उमेदवार जाळ्यात

महागाईची झळ

दिवाळीच्या प्रकाशपर्वाला पुढील आठवड्यात प्रारंभ होत आहे. दीपोत्सवाला उजळविणाऱ्या विविध आकारांतील व ढंगातील पणत्या (मातीचे दिवे) बनविण्याच्या कामाला कारागिरांनी वेग दिला आहे. पणत्या विविध आकारांत तयार करण्यात येतात. लाल मातीपासून तयार होणाऱ्या या पणत्या डझनाच्या भावाने मिळतात. त्यांनाही महागाईचा साज चढला आहे. यंदा लहान पणती घेण्यासाठी डझनामागे १५ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे. पणत्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महाग झाल्याने दरवर्षी ही दरवाढ अटळ असते. असे कुंभारांचे म्हणणे आहे. चित्ताकर्षक पणत्यांबरोबरच लक्ष्मीच्या विविध आकारांतील मूर्तीदेखील तयार केल्या जात आहेत.

मेहनतीचे काम

पणती बनवण्यासाठी नदीकाठच्या मऊ मातीची गरज असते. ही माती पाण्याच्या एका हौदात टाकली जाते. माती अशा पद्धतीने टाकली जाते की, त्याची पातळ रबडी होईल. या मातीची तयार झालेली रबडी एका खड्ड्यात गाळून घेतली जाते. खड्डयात झालेला चिखल बाजूला काढून त्याचा साठा केला जातो. हा चिखल चांगला तुडवून एकजीव केला जातो. अशा प्रकारे तयार झालेला मऊ चिखल पुन्हा कणीक मळल्यासारखा मळून घेऊन त्याचा चाकाजवळच साठा केला जातो. यातील पणत्या तयार करण्यासाठी आवश्यक तेवढा चिखल घेऊन, फिरत्या चाकावर ठेवून त्याला पणतीचा आकार दिला जातो. फिरत्या चाकावरून तयार झालेली पणती काढण्यासाठी दोऱ्याचा वापर केला जातो. तयार झालेल्या पणत्या सावलीत चांगल्या सुकवल्या जातात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of making lakshmi idols and pantya in gondia has picked up pace the demand has increased this year sar 75 ssb
First published on: 05-11-2023 at 10:33 IST