लोकसत्ता टीम
नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी १९८९ पासूनच दगडांची खरेदीसह इतर काही कामे सुरू केली होती, असा दावा आंतराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील अनेक मंत्री व भाजपचे नेते वारंवार मोदी सरकारने झटपट आयोध्येतील श्रीराम मंदीर बांधल्याचा दावा करतात. परंतु, या पत्रपरिषदेतील दाव्याने मोदी सरकारला डॉ. तोगडिया यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. डॉ. तोगडिया पुढे म्हणाले, १९८९ पासून आम्ही देशातील ८ कोटी जनतेकडून प्रत्येकी १.२५ रुपये देणगी गोळा करून ६० हजार चौरस फूट दगड खरेदी केला. मंदिरासाठीचा ढाचा व मंदिराची आकृती निश्चित करून दगडांची कापणीही सुरू केली. त्यातूनच आतापर्यंत मंदिराच्या ५४ हजार चौरस फुटाचे काम झाले आहे. इतरही दगड पुढे मंदिराला लागतील, असेही डॉ. तोगडिया म्हणाले. त्यामुळे आताच्या तीन महिन्यातच मंदिराचे काम झाले, असे म्हणणे योग्य नसल्याचेही डॉ. तोगडिया यांनी सांगितले.
आणखी वाचा- विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यात “ऑरेंज अलर्ट”
देशभरात १ लाख हनुमान चालिसा केंद्र
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने देशभरात १३ हजार हनुमान चालिसा केंद्र सुरू केले आहे. वर्षभरात या केंद्रांची संख्या १ लाखापर्यंत वाढवली जाईल. या केंद्रात आठवड्यात एक वेळा हनुमान चालिसा पठण केले जात असून येथे नि:शुल्क डॉक्टरांची सेवा घेत नागरिकांचे रक्तदाब, मधुमेह तपासणीसह गरिबांना धान्य वाटपासह इतरही सामाजिक कामे केली जातात. या केंद्रात हनुमान चालिसा डेव्हलपमेंट अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचेही, डॉ. तोगडिया म्हणाले.
परमेश्वराच्या व्यतिरिक्त कुणाला घाबरत नाही
भारतात मी कोणत्याही पक्षाचा नव्हे तर हिंदुत्वाचा प्रचार करतो. मी परमेश्वराच्या व्यतिरिक्त कुणालाही घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा माझे मित्र असल्याने त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जम्मू कश्मीरमध्ये लोकांनी निवडलेले सरकार लवकर स्थानापन्न व्हावे, अशी माझी इच्छा असली तरी हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून स्वत:चे सरकार निवडण्याची गरजही डॉ. तोगडिया यांनी विशद केली.
आणखी वाचा- गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश
…तर गडकरी पाकिस्तानचे रस्ते बांधताना दिसतील
देशात नरेंद्र मोदी, अमित शहा असेपर्यंत चिंता नाही. लवकरच आपण अखंड भारत पाहणार आहोत. लवकरच नितीन गडकरी लाहोरमध्ये बसून पाकिस्तानात रस्ते बांधताना दिसतील, असेही तोगडिया म्हणाले.