भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागली.

पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील जुनोना आणि परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अद्यापही काम रखडलेले आहे.

हेही वाचा – आनंदवार्ता..! देशात आता ‘सीए’च्या वर्षांत तीनवेळा परीक्षा

अशात रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना १२ जुलै रोजी घडली. बाब नागरिकांच्या लक्षात आली. मात्र, नागरिकांना शेती कामाकरिता जायचे असल्याने अनेकांनी या प्रवाहित पाण्यातून जीवघेणा प्रवास करून पैलतीर गाठले आहे.

मागील कित्येक दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. दोन दिवसांपूर्वी वरुणराजाने अखेर विदर्भातील काही जिल्ह्यांना अक्षरक्षः झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मागील दोन दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, ‘यांना’ संवर्ग बदलण्याची संधी

भारतीय हवामान खात्याने विंदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज भंडारा, गोंदिया नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीला यलो अलर्ट तर उद्या १३ जुलैलीला बुलढाणा, वाशिम अकोला वगळता उर्वरित विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर पुढील तीन दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. पुढील पाच दिवस कुठे हलक्या, कुठं मध्यम तर कुठे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत अडकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशातच दोन दिवस झालेल्या पावसाने लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याने या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असले तरी सध्या शेतीची लगबग सुरू असल्याने परिसरातील शेतमजुरांनी या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढून कामाला जावे लागले.