लोकसत्ता टीम

अकोला: भारतीय चांद्रयान ३ मोहिमेने देदिप्यमान व अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर अवकाशातील तीन घटनांची पर्वणी खगोलप्रेमींना लाभणार आहे, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

चंद्र सात टक्के मोठा दिसणार असून महिन्यात दुसऱ्यांदा ‘सुपरमून’ आला आहे. सूर्यमालेतील सर्वात सुंदर वलयांकित शनी ग्रह आहे. २७ ऑगस्ट रोजी सूर्य पृथ्वी आणि शनी ग्रह एका रेषेत येईल. पृथ्वी आणि शनी या ग्रहाचे अंतर सर्वाधिक कमी झाल्याने शनी ग्रह पूर्व आकाशात चांगल्यापैकी रात्रभर पाहता येईल.

आणखी वाचा-राज्यातील पहिले दंत परिवेक्षण शास्त्रचे ‘सेंटर फॉर एक्सलेंस’ नागपुरात

सोबतच त्याच्या आकर्षक कड्यांचा दर्शनाचा लाभ दुर्बिणीतून घेता येईल. शनी ग्रहापासून पृथ्वी सुमारे १३१ कोटी कि.मी. अंतरावर आहे. त्याची तेजस्वीता प्रत सुमारे ०.४ राहणार आहे. ३० ऑगस्ट रोजी शनी आणि चंद्र हे पूर्व क्षितिजावर एकमेकांच्या अगदी जवळ पाहता येतील. या वेळी शनी ग्रह चंद्रापासून केवळ दोन अंश उत्तर बाजूस दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढगांच्या लपंडावातही कधीतरी ही जोडी रात्रभरात पाहता येईल. ३१ ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून जवळ असल्याने आकार व प्रकाशात सात टक्के अधिक मोठा दिसेल. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून केवळ तीन लाख ५७ हजार किलोमीटर जवळ असेल. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आणि अखेरीस ‘सुपरमून’ असे एकाच महिन्यात दोन ‘सुपरमून’ आल्याने त्याला ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. प्रत्यक्षात चंद्र निळ्या रंगात असणार नाही. अशा या महत्वपूर्ण तिन्ही घटनांचा आनंद खगोल प्रेमींनी अवश्य घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.