यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण करताना यवतमाळ शहराबाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास करत शहरात प्रवेश करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने शहराबाहेरील महामार्गाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेकदा अपघात होत आहे. ही चूक सुधारण्यासाठी प्राधिकरणने आता तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यवतमाळ शहराबाहेरून बुटीबोरी-यवतमाळ-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ३६१) गेला आहे. या महामार्गामुळे प्रवास सुकर झाला. मात्र, यवतमाळ शहरात प्रवेश करताना या महामार्गावर कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी महामार्गावरून शहरात येताना विरुद्ध दिशेने यावे लागत आहे. यातून अनेक अपघात होत आहेत. त्यासाठी शहराबाहेरील मार्गावर तीन उड्डाणपूल निर्मितीचा प्रस्ताव रस्ते महामार्ग प्राधिकरणने शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली. शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्चून हुंडाई शोरूमजवळ, वनवासी मारोती चौफुली आणि घाटंजी मार्ग येथे हे तीन उड्डाणपूल बांधले जाणार आहेत.

हेही वाचा – शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार आता अंडा बिर्याणी, शिक्षण खात्याचा निर्णय

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्त्री संवाद यात्रा उद्या रामटेकमध्ये, रश्मी ठाकरे करणार मार्गदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहराला लागून गेल्याने नांदेड व नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांचा वेळ वाचत आहे. वाहतूक कोंडीही टळत आहे. लांब पल्ल्याची वाहतूक सोयीची झाली तरी यवतमाळ शहरात प्रवेश करताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते. नागपूरहून यवतमाळात येताना हुंडाई शोरूम समोरून वाहनधारक विरुद्ध दिशेने येतात. नांदेडकडून येताना वनवासी मारुती चौफुली परिसरातूनही नागरिक थेट दीड ते दोन किलोमीटर विरुद्ध दिशेने येतात. या चौकात नेहमीच अपघात होतात. घाटंजीकडून येणारी वाहनेही अशीच विरुद्ध दिशेने येतात. या तांत्रिक चुकीमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे आता नागपूर मार्गावर हुंडाई शोरूमजवळ उड्डाणपूल होणार आहे. तसेच घाटंजी-अकोला बाजार जाणाऱ्या मार्गावरही उड्डाणपूल प्रस्तावित आहे. वनवासी मारोती मंदिराजवळही उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलांमुळे वाहनधारकांची जीवघेणी कसरत थांबणार आहे. मात्र हे उड्डाणपूल तयार करताना सर्व्हिस रोड मोठे ठेवावे व आर्णी मार्गाहून दारव्हा मार्गाकडे जाणाऱ्या भोयर बायपासची समस्याही सोडवावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.