वर्धा : वाढदिवस धडाक्यात साजरा करण्याचा मानस प्रत्येक व्यक्ती तसेच त्याचे कुटुंब ठेवत असते. तसेच आनंद साजरा करण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत पण काही आखतात. पण असाच बेत जीवावर बेतल्याचे हे दुर्दैवी उदाहरण म्हणावे लागेल. वर्धेलगत सिंदी मेघे येथील रहिवासी समीर चुटे, शुभम मेश्राम, सुशील मस्के व धनराज धाबर्डे हे चौघे मित्र. गुरुवारी धनराज याचा वाढदिवस होता. विशितील हे तिघेही रात्रीच कारने सेलूकडे निघाले होते. रात्री वाढदिवस आटोपून परत येत असताना अपघात घडला.

चौघेही वर्धेकडे परत येत असताना समोरून एक ट्रक येत होता. त्यास वाळसा घालण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील कार उलटली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. एकास नागपुरात उपचारासाठी नेत असताना मृत्यू ओढवला. चौथा मित्र धनराज धाबर्डे हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आज पहाटे ही घटना उजेडात आली. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करीत मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहावर वर्धेच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या भीषण अपघाताने सिंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी सिंदी स्मशानभूमीत या तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

वर्धा-नागपूर मार्गावर काही धोकाप्रवण स्थळे आहेत. त्या जागा हेरून उपाय करण्याची बाब खासदार असताना रामदास तडस यांनी उपस्थित केली होती. हा नवा रस्ता असल्याने गाड्या वेगाने धावत असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज वारंवार व्यक्त होत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची अन्य एक घटना शहरात घडली. येथील देहाणकर लेआऊट परिसरात श्रीधर गिरी ५७, हे जलसंपदा विभागात कार्यरत अधिकारी राहतात. ते सायंकाळी विकास भवन परिसर रस्त्याने जात असताना एका वाहनाने त्यांना मागून धडक दिली. त्यात गिरी यांच्या डोक्याला, गळ्याला मार बसला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.