नागपूर : राखी पौर्णिमाचा सण तोंडावर आलाय. मुख्यमंत्र्यांच्याच शहरातल्या लाडक्या बहिणी सुरक्षीत नसल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो कायदा आणि तिन्ही प्रकरणांमध्ये विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले.

पहिल्या घटनेत पालिकेच्या शाळेजवळ राहणाऱ्या २९ वर्षीय शाहरुख शेख हा तीन वर्षांपासून १९ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. त्याने हळूहळू तिच्याशी संपर्क वाढवला. जेव्हा कुटुंबाला कुणकूण लागली तेव्हा पालकांनी मुलीला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्याने शाहरुखला भेटणे बंद केल्याने संतापलेल्या शाहरुखने तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबाने मुलीला नातेवाईकाच्या घरी पाठवले. परंतु शाहरुख तिथेही पोहोचला. त्याने मुलीशी जबरदस्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत बोलली नाही तर लग्न करू देणार नाही, अशी धमकी दिली. त्रासलेल्या विद्यार्थिनीने बेलतरोडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पोक्सो आणि विनयभंग कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

शाळेत जाताना मुलीशी असभ्य वागणूक

दुसऱ्या घटनेत मस्कासाथ येथील तीन नल चौकातला रहिवासी विनय ज्ञानेश्वर डोईफोडे हा दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जुलैपासून पाठलाग करायचा. यावर मुलीने त्याला जाबही विचारला होता. विनयने १ ऑगस्टला पुन्हा तिला वाटेत थांबवले आणि असभ्य वर्तन केले. घरी गेल्यानंतर विद्यार्थिनीने संपूर्ण घटना कुटुंबाला सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून तहसील पोलिसांनी विनयभंग, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

जुन्या प्रेमसंबंधानंतर छळ

गोरेवाडा येथील रहिवासी मनीष चांगू चव्हाण (२५) याची १७ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख होती. या ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. मनिषच्या गैरवर्तनाला कंटाळून मुलीने त्याच्यापासून संबंध तोडले. तरीही मनीष येता जाता तिला रस्त्यात गाठून त्रास देत होता. त्रासलेल्या विद्यार्थिनीने गिट्टीखाना पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने पावले उचलत कारवाई केली असली तरी या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.