वर्धा: मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाच्या अवयवदानातून सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णावर किडनी म्हणजेच मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ताराचंद रामनाथ बांभोरे (३१) या तरुण रुग्णाच्या मरणोत्तर अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले. 

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील रहिवासी ताराचंद बांभोरे याला ‘ब्रेन हॅमरेज’मुळे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रुग्णाचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. वैद्यकीय उपचारांना रुग्णाकडून कोणताही प्रतिसाद मिळणार नसल्याने तेथील शल्यचिकित्सकांनी ताराचंद यांची पत्नी नीलम व परिवारातील सदस्यांना पूर्वकल्पना दिली. अवघे दीड वर्षाचे बाळ कुशीत आणि पती मृत्युशय्येवर असताना किमान अवयवांच्या रूपाने तरी पतीचे अस्तित्व राहील, या भावनेतून नीलम बांभोरे यांनी पतीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नोंदणीसाठी मुदतवाढ

आप्तजनांची अनुमती प्राप्त झाल्यानंतर क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने अवयव शरीरातून विलग करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या अवयवदानातून रुग्णाच्या एका किडनीचे प्रत्यारोपण नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय स्त्री रुग्णावर तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण सावंगी मेघे रुग्णालयात ३६ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले. याशिवाय, नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय रुग्णावर लिव्हर म्हणजे यकृत  प्रत्यारोपण करण्यात आले. 

हेही वाचा… उपराजधानीतील अंबाझरी तलावाचा श्वास कोंडतोय! जलपर्णीचा विळखा घट्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावंगी मेघे येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या अवयवदानातून झालेली ही अकरावी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असून झेडटीसीसीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्यासह डॉ. अक्षय कृपलानी, डॉ. शिवचरण बालगे, डॉ. ऋतुराज पेडणेकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमित पसारी, डॉ. कपिल सेजपाल, डॉ. प्रसाद गुर्जर, डॉ. प्रांजल काशीव, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. वर्मा, डॉ. शीतल यांच्यासह सिस्टर मृणाल, सुनीता रघाटाटे, माधुरी, भारती या चमूने ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेली. या प्रक्रियेत सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, राजेश सव्वालाखे, आदित्य भार्गव, अहमिंद्र जैन, स्नेहा हिवरे, यांनी विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली.