चंद्रपूर : गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिकत असलेले तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाले. गोपाळ गणेश साखरे (२०, रा. चिखली, बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (२०, रा. शिर्डी, जि. अहिल्यानगर) आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे (२०, रा. संभाजीनगर), अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी घडली. तिघांचाही शोध सुरू आहे.
आज शासकीय सुटी असल्याने चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथे पुलाखालील वैनगंगा नदीच्या पात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी अंघोळीसाठी गेले होते. सर्वच विद्यार्थी अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने गोपाळ, पार्थ आणि स्वप्नील हे तिघे बुडाले, तर पाच विद्यार्थी बुडण्याच्या भितीने पाण्याच्या बाहेर आले. बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते नदीपात्रात दूरवर वाहून गेल्याने त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
सध्या उन्हाळा असल्याने नदीचे पात्र कोरडे दिसत असले तरी काही ठिकाणी खोल पाणी आहे. या विद्यार्थ्यांची तिथेच चूक झाली, असे सांगितले जात आहे. माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
यापूर्वी झाला होता तीन बहिणींचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच वैनगंगा नदीच्या याच पात्रात आणि याच घटनास्थळी महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीसाठी गेलेल्या चंद्रपूर येथील तीन बहिणींचा मृत्यू झाला होता. आता वैद्यकीय शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी बुडाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.