अमरावती : समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २०१९ पासून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था सुरू केली आहे. ‘सारथी’मार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, मार्गदर्शन यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते.
सारथीच्या स्थापनेपासून २०२० ते २०२४ या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) विविध परीक्षेमध्ये ११२ विद्यार्थी निवडून शासनामध्ये सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (एमपीएससी) २०२० ते २०२३ या कालावधीत १०४८ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून वर्ग एक मध्ये २२९ तर वर्ग दोन मध्ये ८१९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सारथी ही संस्था शिक्षण, मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत ६३ विविध उपक्रम राबवत आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
सारथी संस्थेत सन २०२१-२२ ते २०२४-२५ एकूण चार वर्षांमध्ये ८ लाख ३८ हजार ४७७ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत मार्गदर्शन घेऊन विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर आतापर्यंत ६४७ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. सारथी संस्थेमधील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवडून येण्याची कामगिरी करीत आहेत.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सारथी मार्फत राबविण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हा राज्यातील सर्व तालुकास्तरावर राबवण्यात येतो. या योजनेमध्ये कालानुरूप विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत १ लाख २० हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार होते, त्यापैकी ९७ हजार २८६ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ३४ हजार ३०४ लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी ७३६५ लाभार्थ्यांना नोकरी मिळाली असून ९४१८ लाभार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये १७ हजार २५१ लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे आयटीआय, पदविका व अभियांत्रिकी पदवी प्राप्त १०१२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापैकी ६५७ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून ३१४ विद्यार्थ्यांना नोकरी लागली आहे.