चंद्रपूर: जिल्ह्यात मानव – वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गोंडपिंपरी तालुक्यात रविवारी वाघाने एका शेतकऱ्याला ठार केल्यानंतर चंद्रपूर – मूल मार्गावर मुख्य रस्त्यावर वाघाने एका मोटारसायकलस्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

चंद्रपूर – मूल मार्ग हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून जातो. रविवारी सायंकाळी या रस्त्याच्या कडेला वाघ उभा होता. त्यामुळे सर्व प्रवासी आपापली वाहने थांबवून वाघाचे दर्शन घेत होते. अंधार असल्याने गाड्यांच्या लाईटच्या प्रकाशात हा वाघ स्पष्टपणे दिसत होता.

त्यानंतर वाघ जंगलात जाण्यास निघाला आणि पलटून पुन्हा रस्त्यावर येऊन मोटारसायकलस्वाराच्या दिशेने हल्ला करण्यासाठी झेपावला. त्याच वेळी मोटारसायकलस्वाराने  गाडी जोरात पळवली. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टाळला आणि मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची थरकाप उडवणारी घटना रविवारी समोर आली. गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला केला.यात त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच वनविभाग, पोलीस पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.