अकोला : प्रत्येक नवा दिवस काही तरी नवे देऊन जातो. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस. सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवसाचा प्रहर असतो; म्हणूनच हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस राहतो. आज, २१ जून या दिवशी सूर्य नेमका कर्कवृत्तावर येईल व सूर्याचे दक्षिणायन आरंभ होईल. याच दिवशी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर सहा महिन्यांच्या दिवसातील बरोबर दुपार असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासुन विषुववृत्ताकडे दिवस लहान होत, आर्क्टिकवृत्तावर २४ तासांचा तर कर्कवृत्तावर साडेतेरा तास, विषुव वृत्तावर बारा तास, आपल्या भागात दिवस सुमारे सव्वा तेरा तासांपेक्षा मोठा (१३ तास १९ मिनिटे) व रात्र पावणे अकरा तासांपेक्षा (१० तास ४१ मिनिटे) एवढी लहान राहील. पृथ्वीच्या कलून फिरताना आकाशात सूर्योदयाचे स्थान रोज बदलत असते. मात्र, फरक काही दिवसांनी लक्षात येतो. यामध्ये वर्षातील चार दिवस अधिक महत्त्वाचे असतात. २१ मार्च व २२ सप्टेंबरला सूर्य नेमका विषुव वृत्तावर तर २२ डिसेंबर रोजी मकरवृत्त व २१ जून रोजी कर्कवृत्तावर असल्याने पृथ्वीवरील स्थान परत्वे दिवस व रात्र यातील वेळा आणि ॠतुमान सुद्धा बदलत असते. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.
दिवस व रात्रीच्या वेळेत बदल का होतो?
पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरत असते. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंश कोनामध्ये कललेला आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धात मार्च ते सप्टेंबर या काळात अधिक प्रखर सूर्यप्रकाश मिळतो. याच काळात उत्तर गोलार्धातील उन्हाळा अनुभवायला मिळतो; तर वर्षाच्या उर्वरित काळात, दक्षिण गोलार्धात सूर्यप्रकाश जास्त असतो. सोलस्टिसच्या काळात पृथ्वीचा अक्ष अशाप्रकारे कललेला असतो की, उत्तर ध्रुव सूर्याच्या बाजूने अधिक तर दक्षिण ध्रुव त्यापासून लांब असतो.
पश्चिम आकाशात बुध आणि मंगळ तर पहाटे शूक्र आणि शनीचे दर्शन
पावसाळी दिवसात वातावरणातील धूळ कणांचे प्रमाण कमी झाल्याने ढगांचे लपंडावातही आकाशात ग्रह तारे खूप सुंदर दर्शन देतात. सध्या स्थितीत संध्याकाळी पश्चिम आकाशात बुध आणि मंगळ तर पहाटे शूक्र आणि शनी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, असे प्रभाकर दोड म्हणाले.