अमरावती : भाजपच्‍या ओबीसी यात्रेदरम्‍यान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर तिखट शब्‍दात टीका केल्‍यानंतर दोघांमध्‍ये वाक् युद्ध पेटले आहे. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमतींना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, असे वक्‍तव्‍य डॉ. बोंडेंनी केले होते. त्‍यावर प्रत्‍युत्‍तर देताना यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, डॉ. बोंडे हे नैराश्‍याने ग्रासलेले आहेत. आज जागतिक मानसिक आरोग्‍य दिन आहे, त्‍यांनी स्‍वत:चा उपचार करून घेण्‍याची गरज आहे. 

भाजपची ओबीसी यात्रा यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ असलेल्या तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात अनिल बोंडे यांनी केलेल्‍या वादग्रस्‍त विधानाने नव्या वादाला तोंड फुटले. ‘काँग्रेसचा डीएनए’  महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे, असेही बोंडे म्हणाले. यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, डॉ. बोंडे ज्‍या पक्षात आहेत, त्‍यांचा एकही नेता स्‍वातत्र्याच्‍या लढ्यात सामील नव्‍हते. पण, स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या वेळी आमच्‍या मोझरीच्‍या वाड्यातून रसद पुरवली जात होती. दुष्‍काळाच्‍या वेळी जमिनी दान केल्‍या म्‍हणून आम्‍हाला ठाकूर ही पदवी मिळाली, हा इतिहास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बोंडे यांनी कॉंग्रेस पक्ष हा ओबीसींच्‍या सोबत नाही, असा आरोप केला होता. तर ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, एकहाती सत्ता असणारे केंद्र सरकार ओबीसीची जनगणना का करत नाही? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला होता.