नागपूर : लोणार सरोवर परिसरात दोन बिबट्यांनी रविवारी पर्यटकांना दर्शन दिले. ‘मी लोणारकर’ चमूचे सदस्य सचिन कापुरे यांनी या दोन्ही बिबट्यांना कॅमेऱ्यात टिपले. लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. शेवाळवर्गीय वनस्पती वगळता कोणताही सजीव प्राणी येथे जगण्याची शक्यता नव्हती.

मात्र, लोणार सरोवर आणि लगतच्या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आल्यामुळे येथील वन्यजीवांना संरक्षण मिळाले. तसेच लोणार सरोवरालादेखील सुरक्षाकवच मिळाले. शासनासोबतच ‘मी लोणारकर’ समूह अनेक वर्षांपासून हा जागतिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे एक नाही तर दोन बिबट पर्यटकांना याठिकाणी दिसून आले.

हेही वाचा >>> Weather Update: आनंदवार्ता! पावसाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संवर्धनामुळे या परिसरातील वन्यजीव आता मोकळा श्वास घेत आहेत. लोणार सरोवराच्या काठावर फिरत असताना या दोन बिबट्यांचे दर्शन झाले. ते सुमारे एक वर्ष वयाचे असावेत. या परिसरात त्यांना पाहणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे. या परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावे. एकट्याने फिरू नये. – सचिन कापुरे, सदस्य ‘मी लोणारकर’