भंडारा : ८ ते १० लाख किमतीचा ट्रॅक्टर ९० टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केली. सहा महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला. मात्र सहा महिने लोटूनही दोषींवर कारवाई झालेली नसून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळाले नाहीत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आता आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
९० टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून १ लाख ३० हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून ३ लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. शेतकरी आणि आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा घोटाळेबाज सहा महिने फरार होता. भंडारा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून अखेर या घोटाळेबाजाला गडचिरोलीतून अटक केली होती. मात्र पुढील कारवाई अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या आदिवासी बांधवांना त्यांचे ट्रॅक्टर मिळालेले नाहित. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कंपनीचे सीईओ मारुती नैताम, अध्यक्ष रोशन सावतवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा गैरवापर वैयक्तिक मालमत्ता बांधण्यासाठी केल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या पैशातून आठ ट्रॅक्टर (सुमारे ८० लाख रुपये), एक ब्रेझा कार (१५ लाख), एक नवीन गोदाम (१५ लाख), एक घर (५० लाख) आणि एक बुलेट हंटर मोटरसायकल (१.५ लाख रुपये) खरेदी करण्यात आली.
पीडित शेतकऱ्यांच्या तक्रारी बऱ्याच काळापासून प्रशासनापर्यंत पोहोचत आहेत. पहिली तक्रार २९ जानेवारी २०२५ रोजी नोंदवण्यात आली, १८ मे २०२५ रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना विनंती करण्यात आली, ५ जुलै २०२५ रोजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्र लिहून कारवाईची मागणी केली, तर २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयानेही पत्र जारी केले. असे असूनही, पीडित शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. प्रशासन कारवाई का करू शकत नाही? पीडित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न आता अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची लूट झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही. कंपनी चालकांवर कठोर कारवाई करून पीडित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ न दिल्यास शेतकरी बांधव आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. कंपनी चालकांना तात्काळ अटक करावी आणि त्यांची मालमत्ता जप्त करावी आणि सर्व पीडितांना त्यांचे पैसे परत करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तक्रारी असूनही, प्रशासकीय पातळीवर आतापर्यंत हलगर्जीपणा का आहे असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गरीब आदिवासी शेतकऱ्यांचा आवाज कधीपर्यंत दाबला जाणार आहे अशी विचारणा आता केली जात आहे.
या दरम्यान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तुमसर, भंडारा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी सावंत कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले आणि दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. जर त्वरित कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही परिषदेने दिला.
निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली शाखा भंडारा चे अध्यक्ष विनोद वट्टी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल टेकम, शिशुपाल पुराम, दुर्गा पार्टेती, संजय मरस्कोल्हे, रवींद्र पार्टेती, संतोष भलावी, गोनिंद पट्टे, चंदवाडे, चंदवाडे आदी उपस्थित होते. सराटे, धवलसिंग हटवार, प्रमोद कुंभारे, जितेंद्र बमलुटे, कृष्णा आले, पद्माकर कोकाटे, रतिराम खिलसुंगे, बिसन इडपाचे, देवानंद मरस्कोल्हे, अनिल खंडाते, दिनेश पंधेरे, प्यारेलाल गायकवाड, भगवान धुकळे, रणजित कुंभारे, रामराम कुंभारे, नराधम गावडे, ना. मरस्कोल्हे, धर्मराज मरस्कोल्हे, गिरधारी नरनवरे, मोरेश्वर नरनवरे, युवराज उईके यांच्यासह जिल्ह्यातील ट्रॅक्टर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातच नाही तर परराज्यातही घोटाळे उघड
भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातचं नव्हे तर, या घोटाळेबाजाने राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही जाळे पसरवून नागरिकांकडून कोट्यवधींची फसगत केल्याचं आता समोर आले आहे.
आदिवासी बांधवांचा विश्वास केला संपादन..
मारोती अशोक नैताम (३५) असे कोट्यवधींने नागरिकांना फसविणाऱ्याचं नावं आहे. तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील रहिवाशी आहे. उच्च शिक्षित असलेल्या मारोती नैतामला मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा बोलता येतात. त्यासोबतचं त्यानं नैतान या आडनावाचा गैरफायदा घेतला. नैताम हे आडनाव आदिवासींमध्ये आहे, मात्र हा ओबीसी (तेली) समाजाचा असतानाही त्यानं आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला.
ट्रॅक्टर साठी दागिने ठेवले गहाण
या घोटाळेबाजाने भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली येथे जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावानं कंपनी स्थापन करून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली. सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अनेकांनी त्यांचे दागिने गहाण ठेवलेत, अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते.