अमरावती : शहरातील राजकमल आणि जयस्तंभ चौक ते रेल्वे स्थानक, हमालपुरा मार्गाला जोडणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण अशा रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे संरचनात्मक लेखापरीक्षणात (स्ट्रक्चरल ऑडिट) आढळून आल्यानंतर वाहतूक तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, हा उड्डाणपूल जीर्ण झाला असताना या पुलाच्या सौंदर्यीकरणावर सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करण्याचे औचित्य काय होते, असा सवाल काँग्रेसने केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात जाब विचारला आहे.

दोन वर्षांपूर्वी आपल्या विभागामार्फत शासनाकडे या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे, स्ट्रक्चरल ऑडिटद्वारे हा उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही, सार्वजनिक बांधकाम विभागाने सौंदर्यीकरणासाठी अंदाजे २ ते २.५ कोटी रुपये इतका निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

जीर्ण उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणासाठी २ ते २.५ कोटी रुपये खर्च करण्यामागील उद्देश आणि औचित्य काय होते? सौंदर्यीकरणासाठी वापरण्यात आलेला निधी कोणत्या स्रोतातून प्राप्त झाला होता? या कामासाठी निविदा प्रक्रिया कशा प्रकारे राबवण्यात आली? सदर कामाचे कंत्राट कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले? या प्रकल्पाची एकूण अंदाजित रक्कम किती होती? कामाचा कार्यकाळ किती होता, सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले आहे का? सौंदर्यीकरणामध्ये नेमकी कोणती कामे समाविष्ट होती?  उड्डाणपूल जीर्ण झाला असताना सौंदर्यीकरणाची कामे का करण्यात आली?, हे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

जनतेच्या पैशांचा गैरवापर हा गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार असून या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि लेखी माहिती येत्या सात दिवसांत उपलब्ध करून द्यावी.अन्यथा, अमरावती शहर काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जनआंदोलन उभारण्यात येईल. यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकाराची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

रेल्वे उड्डाणपूल बंद झाल्याने पूर्व ते पश्चिम या भागात ये-जा करणाऱ्या अमरावतीकरांना फेरा घालून जावे लागत आहे. त्यातच इर्विन चौक ते राजापेठ मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्यातच या जीर्ण पुलावर कशासाठी खर्च करण्यात आला, असा प्रश्न विचारला जात आहे.