नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडण्यास पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. रस्त्यावरील अस्ताव्यस्त असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उचलण्याचा ठेका खासगी कंपनीला दिल्याने कमाईचा मुख्य स्रोत हातून गेल्याने वाहतूक पोलिसांमध्ये खदखद असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील रस्त्यावर किंवा नो पार्कींग झोनमध्ये उभी वाहने उचलून नेण्यासाठी विदर्भ इंफोटेक प्रायव्हेट लिमिटेड डेकोफर्न कन्सोर्टीयम या कंपनीने नागपूर पोलीस, महापालिका यांच्याशी करार केला आहे. त्यामुळे आता शहरात खासगी कंपनीच्या टोईंग व्हॅन वाहने उचलत आहेत. मात्र, पूर्वी पोलीस विभागाच्या टोईंग व्हॅन होत्या. प्रत्येक वाहनावर दोन ते तीन पोलीस कर्मचारी कार्यरत होते. टोईंग व्हॅनवरील पोलीस कर्मचारी मोठमोठी दुकाने, बार, हॉटेल, नाश्त्याची दुकाने इत्यादीसमोरील वाहने उचलण्याची भीती घालवून मोठी कमाई करीत होते. तसेच रस्त्यावरून वाहन उचलल्यानंतर कार्यालयात आणण्यापूर्वीच पैसे घेऊन वाहन सोडून देण्यात येत होते. पोलिसांचा मोठा आर्थिक स्रोत टोईंग व्हॅनला मानल्या जात होते. मात्र, आता विदर्भ इंफोटेक या खासगी कंपनीची शहर पोलीस दलाच्यावतीने १० टोईंग वाहने कार्यरत आहेत. त्यापैकी ६ वाहने रस्त्यावरील दुचाकी उचलून नेत आहेत तर ४ वाहने चारचाकी वाहने उचलून वाहतूक शाखेत जमा करतात.
हेही वाचा – नागपुरात नवीन डेंग्यू संशयितांची चाचणी होणार कशी? नवीन किट्स आल्या पण…
दुचाकीला ७६० रुपये तर चारचाकी वाहनाला १०२० दंड आकारण्यात येणार आहे. त्यापैकी चारचाकीसाठी १०२० रुपयांपैकी नो पार्किंगचा दंड म्हणून वाहतूक विभागाला ५०० रुपये मिळणार आहेत, तर महापालिकेला जागाभाडे म्हणून केवळ २० ते ३० रुपये देण्यात येत आहे. उर्वरित ५०० रुपये वाहने देणारी विदर्भ इंफोटेक कंपनीचा वाटा आहे. टोईंग व्हॅन खासगी असल्यामुळे पोलीस कर्मचारी कारवाई न करता सुस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली आहे.
वाहनचालकांशी वादावादी
पूर्वी टोईंग व्हॅनवरील वाहतूक पोलीस उद्धघोषणा करून वाहन उचलत होते. जर वाहनाचा मालक लगेच हजर झाल्यास वाहन हटविण्याचे आदेश देऊन दंडात्मक कारवाई करीत नव्हते. मात्र, खासगी कंपनीच्या टोईंग व्हॅनवरील मजूर वाहन उद्घोषणाही करीत नाहीत आणि मालक आल्यानंतरही वाहन सोडत नाहीत. कंपनीकडून मजुरांना वाहन उचलण्याच्या पूर्तीचे लक्ष्य दिल्या जाते. त्यामुळे अपंग, आजारी आणि रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांच्याही दुचाकी उचलून नेत आहेत.
जॅमर वाहनांचीही चांदी
रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये किंवा वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून उभ्या वाहनांना जामर लावल्या जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या वाहनातील खासगी युवकाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस वसुली करतात. व्हेरायटी चौक, रामदासपेठ, वर्धा रोड, खामला, उज्ज्वलनगर, इंदोरा, पाचपावली, महाल, सोनेगाव, गांधीबाग आणि सीताबर्डीत उभ्या वाहनाला जामर लावून वसुली करण्यात येत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – राज्यातील सर्वांत मोठ्या कावड महोत्सवाचा जाणून घ्या इतिहास, महत्त्व
प्रत्येक टोईंग व्हॅनवर एक वाहतूक पोलीस कर्मचारी असतो. शहरातील अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था बिघडू नये म्हणून वाहन उचलून दंडात्मक कारवाई केल्या जाते. नागरिकांना रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून नो पार्किंगमधील वाहने उचलली जातात आणि शासकीय नियमांनुसार दंड भरल्यानंतर वाहन सोडल्या जाते. – विनोद चौधरी, प्र. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.