अकोला : मध्य रेल्वे मार्गावर आणखी एका टप्प्यात ‘ऑटोमॅटिक सिग्नलिंग’ प्रणालीचे कार्य पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेच्या प्रत्येक एक कि.मी. मार्गावर सिग्नल राहील. या कामामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळून त्याची गती वाढेल. रेल्वे गाड्या वेळेवर धावण्यास मदत होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भुसावळ ते बडनेरा रेल्वे मार्गावरील शेगाव – श्री क्षेत्र नागझरी – पारस दरम्यान १७.३ कि.मी.च्या मार्गावर ‘ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली १४ ऑगस्ट रोजी यशस्वीपणे सुरू केली. या ‘ऑटोमॅटिक सिग्नलिंग’ प्रणाली अंतर्गत सुमारे प्रत्येक एक कि.मी. किंवा ४०० मीटरवर सिग्नल बसविण्यात येतात. ज्यामुळे अधिक गाड्या चालविणे शक्य होते. एकदा एखादी गाडी सिग्नल ओलांडून गेल्यानंतर, ती पुढील स्थानकात पोहोचण्यापूर्वीच दुसरी गाडी रवाना करता येते. या कामासाठी चार दिवसांचे ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ काम तसेच एक दिवसाचे ‘नॉन इंटरलॉकिंग’ काम नियोजित करण्यात आले होते.

१० तासांचा ‘डिस्कनेक्शन’ ज्यामध्ये ३ तास अप व ‘डाउन ट्रॅफिक ब्लॉक’ समाविष्ट होता. ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ काम पूर्ण झाल्यानंतर नॉन इंटरलॉकिंग काम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. याची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यामध्ये शेगाव – श्री क्षेत्र नागझरी आणि पारस हे दोन पूर्ण विभाग आता ‘ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शन’मध्ये रूपांतरित झाले आहेत. डाउन दिशेला १४ ‘ऑटोमॅटिक सिग्नल’ व एक सेमी-ऑटोमॅटिक सिग्नल बसविण्यात आले असून, अप दिशेला १३ ऑटोमॅटिक सिग्नल व दोन सेमी-ऑटोमॅटिक सिग्नल बसविण्यात आले आहेत.

१२० कि.मी.मध्ये ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली

‘ऑटोमॅटिक सिग्नलिंग’ प्रणालीच्या प्रगत उपक्रमांतर्गत आतापर्यंत भुसावळ – पारस विभागात एकूण १२० कि.मी.मध्ये ‘ऑटोमॅटिक सिग्नलिंग’ प्रणाली यशस्वीपणे स्थापित करण्यात आली आहे. ‘ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली कार्यान्वित झाल्याने या विभागातील रेल्वे मार्ग क्षमतेत वाढ होणार असून भुसावळ – बडनेरा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील गाड्यांची गर्दी कमी करण्यास मदत होईल. तसेच गाड्यांच्या गतीत सुधारणा होऊन वेळेवर गाड्या धावण्यास मदत मिळेल, ज्याचा थेट फायदा प्रवाशांना होऊन त्यांना अधिक चांगला व सुखद प्रवास अनुभव मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने व्यक्त केला आहे.