नागपूर : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नागपूर येथील संविधान चौक ते सेवाग्राम दरम्यान होणाऱ्या ‘संविधान सत्याग्रह’ पदयात्रेवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. यामुळे ही यात्रा राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.‘हम भारत के लोग’ या संस्थेच्या पुढाकारातून आणि विविध नागरी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. संविधानिक मूल्यांचे रक्षण, सामाजिक सौहार्द आणि गांधीवादी विचारांचा प्रचार हा या यात्रेचा मुख्य हेतू आहे. देशभरातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे.
मात्र, काँग्रेस पक्षाने या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत आपल्या पक्षाचे नेते, चिन्हे असलेले पोस्टर्स, बॅनर आणि सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे ही यात्रा काँग्रेसचीच असल्याचा आभास निर्माण होत असल्याने नागरी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यात्रेच्या आयोजन बैठकीतही ही नाराजी व्यक्त झाली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले, “ही पदयात्रा नागरी समाजाच्या पुढाकाराने आहे. काँग्रेसचा पाठिंबा स्वागतार्ह असला, तरी त्यांनी यात्रेचे राजकीयरण करू नये.
दरम्यान, यात्रेवर कोणत्याही पक्षाचा प्रभाव पडू नये म्हणून आयोजकांनी ठरवले आहे की तुषार गांधी यांच्या सोबत नोंदणीकृत कार्यकर्ते टी-शर्ट, टोपी व तिरंगा घेऊन पुढे चालतील, तर राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मागे चालावे.आयोजन समितीचे समन्वयक संदेश सिंगलकर यांनी सांगितले, “ही ‘हम भारत के लोग’ संस्थेची यात्रा आहे. तुषार गांधी व हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने ही पदयात्रा होत आहे. काँग्रेसनेही ती यशस्वी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.”सध्या ही पदयात्रा समाजातील अनेक स्तरांचा सहभाग मिळवत असून, तिचा मूळ उद्देश जपण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तुषार गांधी पुढे, राजकीय नेते मागे
या पदयात्रेवर राजकीय पक्षांचा प्रभाव पडू नये म्हणून पदयात्रेसाठी नोंदणी केलेले कार्यकर्ते टी-शर्ट, टोपी आणि तिरंगा ध्वज घेऊन तुषार गांधी यांच्यासोबत चालतील तर राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मागे चालतील, असा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला.
“हम भारत के लोग या संस्थेची ही यात्रा आहे. त्यासाठी तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसने ती यशस्वी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.”- संदेश सिंगलकर, समन्वयक, आयोजन समिती.