लोकसत्ता टीम

नागपूर : आकाशातील कुणीतरी कापलेल्या पतंगला बघून पळत असताना दोघे भाऊ कालव्यात पडले. दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यामध्ये लहान भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला तर दुसऱ्या भावाला नागरिकांनी मदत केल्याने वाचला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादूला येथे घडली.

रात्री उशिरापर्यंत मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. दयाशंकर अवधेत प्रजापती (७, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे. अवधेत प्रजापती हे मोलमजुरी करतात. त्यांना दयाशंकर (७) आणि कैलास (१२) अशी दोन मुले आहेत. बुधवारी दुपारी ते पतंग उडायला घराबाहेर पडले. दोघेही महादुलाजवळील मैदानावर गेले. त्यांची पतंग कुणीतरी कापली. त्यामुळे ते कालव्याच्या शेजारी बसले होते. काही वेळात एक कापलेली पतंग खाली येत होती. ती पतंग पकडण्यासाठी दया आणि कैलास हे दोघेही पळायला लागले. मात्र, पतंगाच्या नादात दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले.

आणखी वाचा-नागपूर : ‘मिशन युवा’ ची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल, जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही नागरिकांना ते पाण्यात गटांगळ्या खाताना दिसले. नागरिकांनी मदतीस धाव घेईपर्यंत दयाशंकर हा वाहून गेला. नागरिकांनी कैलासला पाण्यातून वाचवले. माहिती मिळताच कोराडी पोलिसांचे पथक पोहचले. एसीपी संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वातील पथक वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.