नागपूर. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शहर अशी नागपूरची ओळख आहे. मात्र कायद्याचा कसलाही धाक न उरलेल्या शहरातील गुन्हेगारांमुळे हे शहर गुन्ह्यांची राजधानी बनत चालले आहे. विविध भागांत २४ तासांत घडलेल्या चार वेगवेगळ्या खूनी हल्ल्यात दोघांना प्राण गमवावे लागले. तर गंभीर जखमी झालेले दोघे मृत्यूशी झूंज देत आहेत. लकडगंज परिसरातील जुनी मंगळवारी, गणेशपेठेतील फुले भाजी मार्केट येथे खुनाच्या घटना घडल्या. तर वाठोडा हद्दीतल दिघोरी स्मशानघाटासमोर चाकू हल्ल्यात तिसरा मृत्यूशी झूंज देत आहे. तर चौथ्या घटनेत यशोधरा पोलीस हद्दीत यादवनगरात एकाने काश्मिरी ब्लॅंकेट विक्रेत्यावर सिमेंटच्या गट्टूचे वार करीत त्याला जखमी केले.

जुनी मंगळवारीत खूनाचा थरार

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून चार जणांनी मिळून एकाचा चाकूने वार करीत निर्घूण खून केल्याचा थरार रविवारी रात्री जुनी मंगळवारीतल्या गुजरी चौकात घडला. हर्षल अनिल सौदागर असे मित्रांकडूनच खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार राहूल उर्फ डड्डा शेटे, प्रज्वल उर्फ फारूख कानारकर, प्रज्वल उर्फ पज्जी सुधाकर डोरले, वैभव उर्फ कंडम हिरामण या चौघांनी आधी हर्षलला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. हर्षलने ते देण्यास नकार दिल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राहूलने त्याला मारहाण केली. प्रतिकार केला असता चौघांनी मिळून हर्षलवर चाकूने हल्ला चढवत त्याला जीव जाईपर्यंत मारहाण केली. भर चौकात रात्री ११ वाजून ४० मिनिटाला हे थरारनाट्य घटले. भर चौकात सुरू असलेल्या राड्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लकडगंज पोलीसांनी चौघांनाही शस्त्रासह अटक केली.

दगडावर पडल्याने एकाचा मृत्यू

फुले मार्केटमधील पत्रावळीच्या दुकानासमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात श्वेतांबर उर्फ मुलूक दुर्योधन मेश्राम (४६) याने अमोल पैकूजी बनकर(३६) याला जोरात ढककून दिले. यात तोल गेल्याने अमोल डोक्याच्या भारावर दगडावर आदळला. यात त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाली. उपचारासाठी नेई पर्यंत वाटेत त्याचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलीसांनी या प्रकरणात मृत्यूला जबाबदार असल्यावरून श्वेतांबर मेश्रामला अटक केली.

प्रेमाला विरोध : प्रेयसीच्या भावजीवर वार

जयताळातील आशिष हरसे याचा मेहूणी आणि महेश काळे यांच्या प्रेमाला विरोध होता. मेहुणीने याची माहिती महेशला दिली. संतापलेल्या महेशने मित्र अनुराग ढोकला सोबत घेऊन रात्री ११ वाजता दिघोरीतल्या दहन घाटाजवळ आशिषला गाठले. या दोघांनी आधी त्याला मारहाण केली. आशिषने प्रतिकार केला असता महेश काळेने पोटात चाकू खुपसला. रक्तबंबाळ अवस्थेत आशिष पडल्याचे पाहून कोणीतरी वाठोडा पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठत आशिषला रुग्णालयात नेले. रात्री उशीरा त्याने दिलेल्या बयाणावरून पोलीसांनी आरोपी महेश काळे आणि अनुराग ढोकला अटक केली. जखमी आशिषवर खासगी इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

ब्लँकेट विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गल्लोगल्ली फिरून ब्लँकेट विकणारा काश्मिरी तरुण फहिम खान ममतूर मरगक याला ओळखीतल्याच अजय चव्हाण याने तुम्ही दहशतवादी असल्याचा आरोप करून डोक्यात सिमेंटच्या गट्टूने वार करीत गंभीर जखमी केले. अजय हा फहिम खानचा नेहमीचा ग्राहक आहे. त्याच्याकडून अजयने यापूर्वीही ब्लँकेट खरेदी केले आहेत. अजयकडे एक जूना फ्रिज विक्रीसाठी होता. त्यावहून फहिम खान जुना फ्रिज घेण्यास तयारही झाला. मात्र अजयचे मित्र ऋषी आणि मयंक या दोघांनी फहिमला शीवीगाळ करीत मारहाण केली. यात अजयने तूम लोग दहशतवादी हो असे धमकावत जवळच पडलेला गट्टू त्याच्या डोक्यात घातला. यात जमखी झालेल्या फहिमला मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले.