scorecardresearch

अकोल्यात दोन तरुणांनी संपविले जीवन; एकाने अवैध सावकारीला कंटाळून, तर दुसऱ्याचे कारण अस्पष्ट

अकोला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

dead
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

अकोला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाने अवैध सावकारीला कंटाळून जीवन संपवले, तर दुसऱ्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. अंकुश नंदकिशोर राऊत (२४, रा. लक्ष्मीनगर, मोठी उमरी, अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुश काल दुपारी १ वाजतापासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. बुधवारी सिद्धार्थ नगरातील एका घरात अंकुशचा गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती सिव्हिल लाईन पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. अंकुशकडे ‘आई मला माफ कर’ अशा आशयाची चार पानांची चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमधील इतर मजकूर स्पष्ट होऊ शकला नाही.

हेही वाचा >>>प्रेमाला उपमा नाही…! व्हॅलेंटाईन विकमध्ये मूकबधिर प्रेमीयुगुलाचा ‘बोलका’ विवाह; वाचा गोंडपिपरीतील अनोख्या विवाहाची कथा

अंकुशने त्याच्या मित्रांसाठी मध्यस्थी करून एका महिलेकडून काही हजारांची रक्कम घेतली होती. दहा टक्के व्याजावर ही रक्कम घेण्यात आली होती. मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे अंकुश त्या रक्कमेचे महिन्याकाठी व्याज भरत होता. त्याने स्वत:च्या घरकामासाठी एका बँकेकडून कर्जही उचलले होते. त्याचेही हप्ते तो फेडत होता. सावकारी कर्ज देणारी महिला सतत अंकुशच्या घरी व तो काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ तसेच मानसिक त्रास देत होती. याच जाचाला कंटाळून अंकुशने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा >>>वर्धा: शरद पवार यांच्या नियोजित वर्धा दौऱ्यावरून मोहिते व सहकार गटात भडका!

दरम्यान, दुसऱ्या घटनेत मोठी उमरी भागातीलच रहिवासी नीलेश भगवान बोपटे (२८) या तरुणाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. सर्व कुटुंब साक्षगंधासाठी बाहेरगावी गेले होते. कुटुंब घरी परत आल्यावर त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत नीलेशचा मृतदेह दिसून आला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:42 IST