वणी- चिखलगाव मार्गावर लालपुलियाजवळ एका ट्रकची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दोघेही ट्रकच्या मागील चाकात येऊन चिरडले गेले. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेला प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा >>> गजानन अंबुलकर यांच्या गांधीवादी आठवणींचे ‘ कलेचा नंदादीप ‘ पुस्तकाचे प्रकाशन; त्यांचेच चित्र विनोबाजींच्या डाक तिकिटावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कांबळे हे मेघदूत कॉलनी चिखलगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी गुरुवारी लग्नकार्य होते. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणे आले होते. आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील दोन पाहुणे हे दुचाकीने काही साहित्य आणण्यासाठी वणीला आले होते. सामान परत घेऊन ते मेघदूत कॉलनीत परत जात होते. ९ वाजताच्या सुमारास देशप्रेमी हॉटेल जवळ एक ट्रक (एमएच ३४, बीजी १९८३) जात होता. या ट्रकला ओव्हटेक करताना भरधाव ट्रकचा धक्का दुचाकीला लागला.
हेही वाचा >>> ९१ टक्के कामगार सामाजिक सुरक्षेपासून वंचित! अर्थतज्ज्ञ संतोष मेहरोत्रा यांचे प्रतिपादन; ‘एल-२०’ कामगार परिषदेचे उद्घाटन
दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व दोघेही ट्रकच्या मागच्या चाकात आले. दोघांच्याही छाती पासून वरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळावर काही वेळ दोन्ही मृतदेह पडलेले होते. बराच वेळ झाल्याने दोन्ही पाहुणे घरी न आल्याने एकाने त्यांना फोन केला असता दोघांचाही अपघात झाल्याची माहिती मिळाली. कांबळे कुटुंबीय तात्काळ घटनास्थळी पोहोचले. संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचांची तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी काही काळ चक्का जाम केला होता.