नागपूरमध्ये आज महविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यासभेला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच चंद्रकांत पाटीलांनी बाबरी मशीद आणि बाळासाहेबांबाबत केलेल्या विधानाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बाबरी मशीद पाडली, तेव्हा शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मग बाबरी पाडायला तुमचे काका गेले होते का? आणि चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी मान्य आहे का? खरं तर बाबरी पडली तेव्हा भाजपाचा एकही नेता बोलायला तयार नव्हता. भाजपाच्या गोटात पळापळ सुरू झाली. तेव्हा बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असं बाळासाहेब म्हणाले. पण आता भाजपाकडून शिवसेनाप्रमुखांचा अपमान करणं सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. कोरोना काळात मी घरातून काम केलं, असा आरोप माझ्यावर केला जातो. पण मी घरातून काम केलं तरी लोकांच्या सहकार्याने आपण कोरोनाचा मुकाबला केला. त्यावेळी पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर होता. मुळात काम करायची इच्छा असेल तर कुठूनही करता येते. वणवण फिरले म्हणजे खूप काम केलं असं होत नाही, अशा कानपिचक्याही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
हेही वाचा – “…अन् आता टिकोजी राव फणा काढून बसले”; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात!
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. राज्यात अवकाळी पाऊस असताना शिंदे सरकार अयोध्येला गेले, मी मुख्यमंत्री असताना आम्हीही अयोध्येला गेले होतो. संजय राऊत आणि सुनील केदारही त्यावेळी माझ्याबरोबर होते. पण ती वेळ वेगळी होती. मी अयोध्येला पहिल्यांदा गेलो, तेव्हा राम मंदिराचा मुद्दा ठंड बस्त्यात होता. याची सुरुवात शिवसेनेने केली. आम्ही मोदींना राम मंदिरासाठी कायदा करा, असं म्हणत होतो. पण मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टीकोजी राव आता फणा काढून अयोध्येत जाऊन बसले, असं ते म्हणाले.