सध्या माझ्याकडे पक्ष नाही, काही नाही. मात्र तरीही तुम्ही मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. हे प्रेम त्यांच्यावर भारी भरेल. त्यांना मातीत गाडण्यासाठी मी तुमच्यासमोर एकच मागतो, ते म्हणजे तुमचे प्रेम. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्या, अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घातली. 

हेही वाचा >>> शिवसैनिकांनी आमदार रवी राणांचे पोस्‍टर फाडले; अमरावतीत वातावरण तापले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, माता जगदंबा देवी, बाबणलाल महाराज समाधीस्थळी माथा टेकवून महंताचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवसैनिक व जनतेशी संवाद साधला. यावेळी खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख सुधीर कव्हर, जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुणावरही टीका न करता थेट जनतेचा आशीर्वाद मागितला. उपस्थितांनी त्यांच्या हो मध्ये हो भरून त्यांना समर्थन दिले.

हेही वाचा >>> “फडणवीस मुख्यमंत्री राहतील असे ठरले होते”, मुनगंटीवारांचे वक्तव्य; म्हणाले, “उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत…”

संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जनतेतून उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली, नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती.