नागपूर : अंबाझरी तलाव ते माटे चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या मनमानीला कसलाही लगाम लागत नसल्याने येथील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. रस्त्यांवर ताबा मिळवलेल्या विक्रेत्यांना पदपथावरून हटवण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला वेळ नाही. बेशिस्त लावल्या जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यास वाहतूक शाखा तयार नाही तर उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर अन्न व औषध विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे या तिन्ही यंत्रणांचे खाद्य पदार्थ विक्रेत्यांना असलेले अभय स्पष्ट होत आहे. कायदा व सुव्यस्था सांभाळणारी कोणतीही यंत्रणा एकून घ्यायला तयार नसल्याने या भागाताली रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत होऊन संतापाचा उद्रेक होण्याची परिस्थिती आहे.

भर रस्त्यावर खाद्य पदार्थांना फोडणी दिली जाते. त्यामुळे त्यातून उडणारे गरम तेल आणि तिखटाचे शिंतोडे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यांत उडून डोळे जखमी होत आहेत. गाडी चालवताना अचानक उडणाऱ्या या शिंतोड्यामुळे अपघाताच्या घटना देखील घडत असताना पोलीस प्रशासन निमूटपणे हा तमाशा पहात बसले आहे. हे कायद्याचे राज्य आहे का, की काही तरी चिरिमिरी देणाऱ्यांचे राज्य आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

महाविद्यालये आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांमुळे येथील तरुणांची संख्या मोठी असल्याने बेशिस्तीला लगाम राहिलेला नाही. व्हिएनआयटीच्या रस्त्यावरील खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी येणाऱ्या तरुणांना भुकेपोटी आपण गाडी कुठें लावतो याचे देखील गांभीर्य नसते. त्याचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना होतो. खाद्य पदार्थ विक्रीची गाडी लावणारे देखील त्याला अटकाव करत नाहीत की पोलीस वाहनधारकांना दंड लावत नाहीत. त्यामुळे मनमानीला परिसरातील नागरिक वैतागले आहेत.

रस्त्यांवर खरकट्याची दुर्गंधी

लोकांच्या ताटात उरलेले खाद्य पदार्थ आणि विक्री होण्याचे राहून गेलेल्या सडक्या पदार्थांचे खरकटे सर्रास रस्त्यावर फेकले जातात. नासलेल्या या अन्नातल्या दुर्गंधीमुळे परिसरात अनारोग्य पसरत आहे. हे दिसत असतानाही महापालिकेचे उपद्रव शोध पथक काय झोपा काढत आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. माटे चौकाकडून अंबाझरी मार्गावरच्या दोन्ही दिशांनी जागोजागी उघड़्यावर खरकट्यांचे ढिग दिसत आहेत. या रस्त्यावरून जाताना या दुर्गंधीमुळे मळमळ होते. दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यावर मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करायला तयार आहे, ना स्वच्छता विभाग ना उपद्रव शोध पथक. त्यामुळे हे पथक उपद्रवींवर कारवाई करण्यासाठी आहे, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना त्रास देण्यासाठी उपद्रवी आहे, हेच कळेनासे झाले आहे.

पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा त्रास दुपारपासूनच सुरू होतो. तीनच्या सुमारास फोडणी, तेल आणि धुरामुळे जीव नकोसा होत आहे. श्वास घेणे कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही मनपा एकायला तयार नाही. त्यात महापालिकेत लोकप्रतिनिधीही नसल्याने आम्ही गाऱ्हाणे मांडायचे कोणाकडे असा प्रश्न आहे. सायंकाळच्या वेळी साधी खिडकी उघडूनही घरात बसता येत नाही. –सचिन झाडे, निवृत्त अभियंता, रहिवासी, शेवाळकर गार्डन इस्टेट

महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सध्या खामला भागातील मटन मार्केट अतिक्रमण कारवाईत व्यस्त आहे. त्यामुळे आयटी पार्क समोरच्या अतिक्रमणांकडे लक्ष देणे हे सध्या मनपाच्या प्राथमिकतेवर नाही. –मनिष सोनी, जनसंपर्क अधिकारी, मनपा