लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: मामाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या भाच्याने मामाच्या मुलीला पळवून नेले. दोघेही एकाच वेळी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी भाच्याला अनेकदा फोन करुन विचारणा केली. मात्र, तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे मामा-मामी पोलीस ठाण्यात पोहचले. पाहुणा आलेल्या भाच्याने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

रामटेकमध्ये पीडित १७ वर्षीय तरुणी स्विटी (बदललेले नाव) राहते. ती बाराव्या वर्गात शिकते. चार महिन्यांपूर्वी मामाच्या घरी भाचा चिंटू पाहुणा म्हणून आला. तो जवळपास ८ दिवस मामांकडे मुक्कामी थांबला. या दरम्यान मामाची मुलगी स्विटीशी जवळिक वाढली. चिंटूला स्विटी आवडायला लागली. त्यामुळे दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला. चिंटू हा गावी गेल्यानंतरही दोघेही व्हॉट्सअपवरून संपर्कात होते. यादरम्यान त्यांचे सूत जूळले. स्विटी कॉलेजला गेल्यानंतर तो तिला भेटायला येत होता. दोघांच्या नेहमी भेटी-गाठी व्हायला लागल्या. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… एसटी महामंडळाची बस उलटली, राजूर घाटातील घटना; सुदैवाने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, कुटुंबीयांसोबत बोलण्याचे धाडस होत नव्हते. ५ जुलैला चिंटू मामाच्या घरी पाहुणा म्हणून आला. तब्बल पाच दिवस मामाकडे मुक्कामी थांबला. या दरम्यान दोघांनी अनेकदा प्रेमविवाह करण्याबाबत विचार केला. शेवटी कुटुंबीय विरोध करतील म्हणून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मामा-मामी शेतात गेल्यानंतर दोघांनीही घरातून पलायन केले. दोघेही मनसर येथे गेले. सायंकाळी मामा घरी आल्यानंतर भाचा आणि मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी गावात शोधाशोध केली. तसेच काही नातेवाईकांकडे विचारपूस केली. दोघेही पळून गेल्याची खात्री होताच मामा-मामीने थेट पोलीस ठाणे गाठले. बारावीतील मुलीला पळून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.