नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळाने जातीनिहाय जनगणेची घोषणा केली आणि त्यांचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे. मात्र, या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत.

ओबीसी समाज आणि काँग्रेसने गेल्या काही वर्षांत जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. या मागणीमु‌ळे हिंदू समाजात फुट पडण्याचा धोका असल्याचे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक, भाजप अनेक नेते आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जातीनिहाय जनगणनेला प्रतिकूल होते. मात्र, केंद्रीय मंत्री मंडळाने तीन दिवसांपूर्वी अचानक जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला.

आता त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासंदर्भात मोठा निर्णय होईल, असा कयास लावण्यात आला होता. मात्र, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून मोठ्या ट्रोल होत आहेत.

नितीन गडकरी यांनी पुण्यातील एमआयटीच्या कार्यक्रमात आणि अलिकडे नागपुरात अंजूमन महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात जातीबद्दल वक्तव्य केले होते. त्यासंदर्भातील वक्तव्य गडकरी यांच्या समाजमाध्यमांवर खात्यावर आहे. गडकरी म्हणतात, आज कोणत्याही व्यक्तींमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग यामध्ये सामजिक विषमता दिसत असेल तर ती चिंतेची बाब आहे. मात्र व्यक्ती या सर्व गोष्टींनी मोठी होत नाही तर तिच्या गुणवत्तेने मोठी होते.

‘मी पण निवडणुकीला उभा होतो पन्नास हजार लोकांसमोर सांगितले, की ज्या विचाराशी मी कटिबद्ध आहे त्याच्याशी मी कधीही कॉम्प्रमाईज करणार नाही, असे गडकरींनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात बरंच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी ५० हजार लोकांसमोर सांगितलं की मी जात-पात पाळणार नाही.

मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. ‘जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ’. जिसको देना वोट दो, जिसको देना है मत असे म्हणणे आहे. आता जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर गडकरींचे हे जुने भाषण समाजमाध्यमांवर व्हायरलं केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, वरिष्ठ पत्रकार रविशकुमार यांनी गडकरी यांचे छायाचित्र आणि”जो करेगा जात की बात, उसको मारुंगा कसके लात’ अशी पोस्ट एक्सवर टाकला आहे. सोबत त्यांनी अब ये किसको कसके लात मारेंगे असा प्रश्नही केला आहे.