नागपूर : भारतात पेट्रोलमध्ये २० टक्के बायोफ्युएल मिश्रण करण्याचे धोरण स्वीकारल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका होत असताना आता गडकरी यांनी विमानात पाच टक्के बायोफ्युएल टाकण्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे.

विमानाच्या इंधनात पाच टक्के जैवइंधन (बायोफ्युएल) मिसळण्यावर जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. असे घडल्यास भारतीय शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात शनिवारी आयोजित ‘विकसित भारतामध्ये उड्डयन क्षेत्राची भूमिका’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियातर्फे ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद होत आहे. यामध्ये केंद्रीय उड्डयन मंत्रालय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्याचे विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारक सहभागी झाले आहेत. सोबतच या कार्यक्रमाला भारतीय विमानतळ प्राधिकरणचे महाव्यवस्थापक योगीराज सोरटे, एअर ट्रैफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाचे महासचिव आलोक यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले, देहरादून ते दिल्ली या स्पाईसजेटच्या प्रवासात बायोएविएशन फ्युएलचा यशस्वी वापर करण्यात आला. देशातील शेतकऱ्यांकडे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (बायोएविएशन फ्युएल) तयार करण्याची मोठी क्षमता आहे. हे जैवइंधन असून, परळी, तांदळाच्या साली यासारख्या कृषी अवशेषांपासून ते तयार करता येते. डावोस येथे या इंधनाबाबत चर्चा झाली आहे.

भविष्यात विमानतळांचे नियंत्रण नागपुरातून

नागपूर हे भारताच्या हृदयस्थानी आहे. येथून देशातील सर्व प्रमुख शहरांचे अंतर जवळपास सारखे आहे. यामुळे नागपूरला राष्ट्रीय एअर ट्रॅफिक कंट्रोल ग्रिडचे केंद्र बनवणे शक्य होईल. भविष्यात अनेक विमानतळांचे नियंत्रण नागपूरमधूनच होऊ शकते, असेही गडकरी म्हणाले.

येण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही मोठी संधी असून शेतकऱ्यांना नव्या उत्पन्नाचा मार्ग मिळणार आहे. देशात विमानतळांची संख्या झपाट्याने वाढत असून विमानांची आणि हेलिकॉप्टरची मागणीही वाढत आहे. एम्फिबीयस विमाने (पाण्यावर व जमिनीवर चालणारी) यांची गरज भविष्यात भासणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. अशा इंधनामुळे देश स्वावलंबी बनेल आणि ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.

भारतातील हवाई सेवा क्षेत्राचाही झपाट्याने विकास होत आहे. देशात २०१४ पर्यंत ७५ विमानतळ होते, आज त्यांची संख्या १५० पर्यंत वाढली आहे. ‘हेलिकॉप्टर एव्हिएशन’ हे सध्या देशातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.