scorecardresearch

महाराष्ट्रातील विद्यापीठ, महाविद्यालये २० फेब्रुवारीपासून बंद! कर्मचाऱ्यांच्‍या लाक्षणिक संपामुळे विद्यापीठातील कामकाज ठप्प

विद्यापीठातील ३५० कर्मचाऱ्यांच्या सोबत विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयीन २०० शिक्षकेतर कर्मचारी या लाक्षणिक संपात सहभागी होते.

universities colleges in maharashtra close from february 20
कृती समितीचे संघटक तथा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव नरेंद्र घाटोळ, मागासवर्ग कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, बाळासाहेब यादगिरे, संजय तिप्पट, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर बायसकर यांनी संपकर्त्‍या कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

अमरावती : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात गुरुवारी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप सुरू केला, त्यामुळे विद्यापीठातील सर्व कामकाज ठप्प झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल सकारात्मक बैठक झाली, परंतु बैठकीचे कार्यवृत्त प्राप्त झाल्याशिवाय संप मागे घेण्यास कर्मचारी संघटनांनी नकार दर्शविल्यामुळे आज लाक्षणिक संप करण्यात आला. विद्यापीठातील ३५० कर्मचाऱ्यांच्या सोबत विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयीन २०० शिक्षकेतर कर्मचारी या लाक्षणिक संपात सहभागी होते. त्यामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रातील महाविद्यालये ओस पडल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> ‘एसटी’ बस दुरुस्तीसाठी वस्तूसाठा नसल्यास कारवाई

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु असून आता या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणजे २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालये  बंद ठेवण्यात येणार आहे.

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाची योजना विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा­ऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे इत्यादी मागण्यांच्या पूर्तेतेसाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे. कृती समितीचे संघटक तथा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव नरेंद्र घाटोळ, मागासवर्ग कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, बाळासाहेब यादगिरे, संजय तिप्पट, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर बायसकर यांनी संपकर्त्‍या कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 15:24 IST