नागपूर: मानकापूर परिसरातील गजानन नगर, सेंट जोसेफ स्कूल समोर राहणाऱ्या चमनसिंग सैदानीसिंग चितोडिया (४०) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी हिऱ्याचा हार आणि इतर असा एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या कुटुंबाला एका कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी घरातील कपाट उघडल्यावर हा प्रकार पुढे आला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चमनसिंग यांनी २ जून २०२३ दरम्यान त्यांच्या पत्नीचे अंदाजे २१६ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिने व एक हिऱ्याचा हार असा एकूण ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल घरातील लोखंडी कपाटात ठेवला होता.
२९ जूनला दुपारी अडीच वाजता चमनसिंग यांना पत्नीच्या भावाच्या वास्तूपूजेसाठी जायचे होते. त्यामुळे या कुटुंबीयांनी कपाट उघडून बघितले असता दागिने बेपत्ता असल्याचे पुढे आले. या घटनेमुळे त्यांना धक्काच बसला. दागिने कुठेच नसल्याने ते चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पोलिसांना तक्रार दिली.