बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतील पलसोडा (महासिद्ध) या प्राचीन गावातील मारोती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यामुळे संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मंदिरातील हनुमान मूर्तीवरील १ किलो ४५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अज्ञात चोरांनी लंपास केले. संस्थानचे अध्यक्ष शंकर ढोकणे यांनी याबाबत सोनाळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. चोरी झालेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख १ हजार इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, चोरट्यांनी रात्री उशिरा मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी ३५० ग्रॅमचा चांदीचा हार, ३०० ग्रॅमचा कंबरपट्टा आणि सुमारे ८०० ग्रॅमचे गदा व हात-पायातील ५ कडे असा एकूण १.४५ किलो चांदीचा ऐवज चोरून नेला.
चोरीची माहिती मिळताच बुलडाणा येथून श्वान पथक दुपारी १२ वाजताच्या सुमारास दाखल झाले. मात्र, श्वान पथक ठोस माग काढू शकला नाही. ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी ठसे गोळा केले आहे. तसेच मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडे, तसेच सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
पोलीसांनी तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, परिसरातील अनेक ‘सिसिटीव्ही फुटेज’ तपासणी व लोकांची विचारपूस सुरू आहे. संशयित लोकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
निवांत मंदिरे लक्ष्य?
विशेष म्हणजे, याआधी मागील १४ जानेवारी २०२५ रोजी संक्रांतीच्या दिवशी सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध वारी प्रसिद्ध हनुमान पिठात अशीच चोरी झाली होती. त्या धाडसी दरोड्यात ५ किलो ४५० ग्रॅमचे दागिने चोरीला गेले होते. पोलीस त्या प्रकरणाचा शोध घेण्यात अपयशी ठरले. त्या घटनेचा तपास अद्याप अपूर्ण वा अधांतरीच आहे. सातपुडा पर्वतराजीत मारोतीची अनेक पुरातन मंदिरे आहेत. विश्वस्त आणि भाविक या हनुमानरायाला श्रद्धा पोटी चांदीचे दागिने चढवितात. ही मंदिरे निर्जन स्थळी आहेत. यामुळे ही बाब चोरांच्या टोळीसाठी सोयीची ठरते. प्रतिकारची शक्यता नसल्याने चोर निर्धास्तपणे चोरी करून पसार होतात. या दोन घटनावरून चोरांनी अशा निर्जन भागातील मंदिराना लक्ष्य केल्याचे चित्र आहे.